पिंपरी : वाकड-दत्तमंदिर रस्त्याचे काम संथ गतीने, रस्त्यालगत राहणार्‍या रहिवाशांना नाहक त्रास | पुढारी

पिंपरी : वाकड-दत्तमंदिर रस्त्याचे काम संथ गतीने, रस्त्यालगत राहणार्‍या रहिवाशांना नाहक त्रास

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : वाकड-दत्तमंदिर रस्त्याचे काम सध्या संथ गतीने सुरू आहे. येथील रस्ता ठिकठिकाणी खोदून ठेवल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. ड्युडेल सोसायटीच्या प्रवेशद्वारासमोर दीड महिन्यंपासून भूमिगत सांडपाणी नलिका टाकण्यासाठी खोदकाम करून ठेवले होते. त्यामुळे सोसायटीतील रहिवाशांना त्याचा मनस्ताप सहन करावा लागत होता. दरम्यान, येथे खोदकाम केलेला रस्ता शुक्रवारी बुजविण्यात आला.

वाकड-दत्तमंदिर 45 मीटर रुंद रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. हे काम चार महिन्यांपूर्वी सुरू आहे. मात्र, या कामाचा वेग खूपच संथ आहे. त्यामुळे या रस्त्यालगत राहणार्‍या रहिवाशांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. यापूर्वी येथे सांडपाण्याच्या 3 भूमिगत नलिका टाकण्यात आल्या आहेत.

सध्या चौथी भूमिगत सांडपाणी नलिका टाकण्याचे काम सुरू आहे. वाकड रस्त्यावरील ड्युडेल सोसायटीसमोर ही भूमिगत सांडपाणी नलिका टाकण्याचे काम गेल्या दीड महिन्यांपासून सुरू होते. सोसायटीच्या प्रवेशद्वारासमोरच हे काम करण्यात आल्याने सोसायटीत ये-जा करणार्‍या रहिवाशांची चांगलीच गैरसोय होत होती. तसेच, येथे उच्च क्षमतेच्या वीज आणि गॅस वाहिन्या उघड्यावर पडल्या होत्या. दरम्यान, सध्या येथे खोदलेला रस्ता बुजविण्यात आला आहे. या रस्त्याचे काम वेगाने पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.

 

ड्युडेल सोसायटीसमोर भूमिगत सांडपाणी नलिका टाकण्याचे काम गेल्या दीड महिन्यापासून सुरू होते. सोसायटीच्या प्रवेशद्वारासमोरच हे काम सुरू असल्याने रहिवाशांना ये-जा करण्यासाठी रस्ताच नव्हता. शुक्रवारी खोदलेला रस्ता बुजविण्यात आला.
– सुदेश राजे, माजी अध्यक्ष, ड्युडेल सोसायटी, वाकड

Back to top button