खडकवासला क्षेत्रात ओसरला पावसाचा जोर | पुढारी

खडकवासला क्षेत्रात ओसरला पावसाचा जोर

किरकटवाडी : पुढारी वृत्तसेवा: खडकवासला धरणसाखळीतील चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर ओसरला असून एकूण पाणीसाठा 18 टीएमसी (61.72 टक्के) झाला आहे. जोरदार पावसामुळे खडकवासला धरण भरल्यावर 13,138 क्युसेकपर्यंत वाढविण्यात आलेला विसर्ग रविवारी चार वाजता 1712 क्युसेकवर स्थिर करण्यात आला आहे. पावसाअभावी जून महिना कोरडा गेल्याने पुणेकरांवर पाणी कपातीची वेळ आली होती. महानगरपालिकेने पाणी कपात जाहीर केल्यावर एकाच दिवसानंतर पावसाला सुरुवात झाली.

दोन जुलैपासून सुरू झालेल्या पावसाने वरसगाव, पानशेत आणि टेमघर धरण अर्ध्यापेक्षा अधिक भरले, तर खडकवासला धरण तुडुंब भरूल्यानंतर मुठा नदीपात्रात विसर्ग करण्यात आला. अद्यापही रिमझिम पाऊस सुरू असल्याने आणि धरणाच्या पाणलोट क्षेत्रात व पाण्याचा येवा चालू असल्याने धरणातील विसर्ग कमी करत 1,712 क्युसेकवर स्थिर करण्यात आला आहे. गुरुवारी जोरदार पावसामुळे खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रातील विसर्ग 13,138 क्युसेकपर्यंत वाढविण्यात आला होता.

खडकवासला साखळी क्षेत्रात झालेला पाऊस व पाणीसाठा
खडकवासला : 10 मि.मी., 1.97 टीएमसी (100 टक्के); पानशेत : 13 मि.मी., 6.80 टीएमसी (63.90 टक्के); वरसगाव : 10 मि.मी., 7.42 टीएमसी (57.88 टक्के); टेमघर : 15 मि.मी., 1.88 टीएमसी (48.34 टक्के).

 

Back to top button