नव्या व्हेरियंटचे सर्वाधिक 121 रुग्ण पुणे जिल्ह्यात | पुढारी

नव्या व्हेरियंटचे सर्वाधिक 121 रुग्ण पुणे जिल्ह्यात

पुणे, पुढारी वृत्तसेवा: कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना त्यामध्ये नवीन व्हेरियंटची लागण झालेल्या रुग्णांची सर्वाधिक संख्या पुण्यात आहे. रविवारी पुण्यात बीए 4, बीए 5 व्हेरियंटच्या 19 आणि बीए 2.75 या नवीन व्हेरियंटच्या 17 रुग्णांची नोंद झाली. तिन्ही व्हेरियंटच्या रुग्णांची आजवरची संख्या 121 इतकी झाली आहे. कोरोनाबाधितांच्या नमुन्यांपैकी दर महिन्याला 1500 ते 2000 इतक्या नमुन्यांचे जीनोम सिक्वेन्सिंग होत आहे. पुणे, नागपूर, मुंबई, ठाणे, नाशिक या जिल्ह्यांमधील कोरोनाबाधितांची संख्या जास्त असल्याने प्रामुख्याने येथील रुग्णांच्या नमुन्यांचे जीनोम सिक्वेन्सिंग केले जाते.

रविवारी बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या अहवालानुसार नोंद झालेल्या नवीन व्हेरियंटच्या रुग्णांचे नमुने 25 जून ते 4 जुलै या कालावधीतील आहेत. या नमुन्यांची तपासणी पुणे आणि मुंबई येथील इस्कॉनअंतर्गत प्रयोगशाळांमध्ये करण्यात आली. बीए 4, बीए 5 आणि बीए 2.75 हे नवीन व्हेरियंट कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटचे उपप्रकार आहेत. त्यामुळे या व्हेरियंटची लागण झालेल्या रुग्णांमध्ये अतिशय सौम्य लक्षणे आढळून आली आहेत. काही रुग्ण पूर्णत: लक्षणेविरहित आहेत. सर्व रुग्णांचा सखोल साथरोग शास्त्रीय आढावा घेतला जात आहे, असे सार्वजनिक आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

राज्यातील नवीन व्हेरियंटच्या रुग्णांची संख्या 189
राज्यात आत्तापर्यंत आढळलेल्या बीए 4 आणि बीए 5 या रुग्णांची एकूण संख्या 132 इतकी झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 84, मुंबई 33, नागपूर, ठाणे आणि पालघरमध्ये प्रत्येकी 4 आणि रायगडमध्ये 3 रुग्ण आहेत. बीए 2.75 या व्हेरियंटच्या रुग्णांची संख्या 57 असून, यामध्ये पुणे 37, नागपूर 14, अकोला 4, ठाणे आणि यवतमाळ प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.

Back to top button