डोणेमध्ये चारसूत्री भात लागवडीवर भर | पुढारी

डोणेमध्ये चारसूत्री भात लागवडीवर भर

वडगाव मावळ : गेला आठवडाभर झालेल्या दमदार पावसामुळे मावळात भात लागवडीला वेग आला असून पवनमावळ भागातील डोणे येथे कृषी अधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली चारसूत्री पद्धतीने भात लागवड करण्यावर भर देण्यात आला आहे. दरम्यान कृषी विभागाचे अधिकारी भर पावसात उभे राहून मार्गदर्शन करताना दिसत आहेत.

डोणे येथे सोपान दशरथ कारके यांच्या शेतावर कृषि सहाय्यक अधिकारी अक्षय ढुमणे ह्यांच्या मार्गदर्शना खाली चारसूत्री पद्धतीने भात लागवड करण्यात आली. यावेळी कृषि पर्यवेक्षक नंदकुमार साबळे, मंडळ कृषि अधिकारी दत्ता शेटे तसेच संतोष कारके, काकडे, ऋषीकेश कारके, विशाल कारके, सुनील कारके, अशोक कारके, चंद्रकांत चांदेकर आदी शेतकरी उपस्थित होते.

चार सूत्री लागवडीमध्ये पिकाच्या अवशेषानचा फेरवापर होतो, गिरीपुष्प पाल्याचा खत म्हणून वापर, भाताची दोरीच्या साहाय्याने 15 सेंमी बाय 25 सेंमी वर नियंत्रित लागवड, चार चुडाच्या चौकोनात मधोमध युरिया ब्रिकेटचा हेक्टरी 168 किलो वापर केला जातो. या पद्धतीमुळे उत्पादन खर्चात बचत होऊन भाताच्या उत्पादनात वाढ होते, तसेच रोपांची चांगली वाढ होते.

पीक व्यवस्थापन करणे सोपे जाते. रोपे कमी लागतात त्यामुळे रोपांची बचत होते अर्थात बियाणे बचत होते, हवा खेळती राहते व रोपांना सूर्याप्रकाश चांगला मिळतो. त्यामुळे कीड व रोगाला बळी पडण्याची कमी असते, औषध फवारणी करण्यास तसेच बेननी करण्यास सोयीस्कर होते, खतांची बचत होते, मजूर खर्चात बचत होते, भाताची वाढ चांगली होते व भाताचे उत्पादन वाढते.

Back to top button