पुणे : पानशेत रस्त्यावर दरडी कोसळल्या; सुदैवाने दुर्घटना टळली | पुढारी

पुणे : पानशेत रस्त्यावर दरडी कोसळल्या; सुदैवाने दुर्घटना टळली

वेल्हे, पुढारी वृत्तसेवा : पुणे-पानशेत रस्त्यावर शनिवारी (दि. 16) सकाळी सव्वाअकरा वाजेच्या सुमारास मुसळधार पावसात सोनापूर (ता. हवेली) येथे तोडलेल्या डोंगराची मोठी दरड कोसळली. त्यावेळी तेथून जाणार्‍या नागरिकांच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली. चारच दिवसांपूर्वी रुळे गावाजवळ सोनापूर हद्दीत धरणालगतचा रस्ता खचल्याने वाहतूक बंद पडली होती. अद्यापही अवजड वाहतूक बंद आहे. आजच्या घटनेमुळे पानशेत रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक बनल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे पर्यटकांसह स्थानिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मुख्य पानशेत रस्त्यालगत असलेला सोनापूर येथे डोंगर प्लॅटिंगसाठी मोठ्या प्रमाणात तोडण्यात आला आहे.

प्लॅटिंगच्या संरक्षक भिंतीसह डोंगराची दरड कोसळली आहे. विजेचे खांबही वाकले आहेत. रस्त्यावर दरडीच्या दगडी, मलबा पडल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. आमदार भीमराव तापकीर यांनी या घटनेकडे तत्काळ प्रशासनाचे लक्ष वेधले. दुर्घटना टाळण्यासाठी आवश्यक खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर तातडीने सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजय भोसले यांच्या देखरेखीखाली जेसीबी मशीनच्या साहाय्याने दुपारी दरडी हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले. त्यामुळे काही प्रमाणात वाहतूक सुरू झाली. रस्ता तसेच शेजारचा डोंगर खचला असल्याने नागरिकांनी सावधानता बाळगावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

अवैध खोदकामाकडे दुर्लक्ष
पुणे-पानशेत रस्त्यावर ओसाडे ते पानशेत कुरण खुर्दपर्यंत बाजूला डोंगर व दुसर्‍या बाजूला खडकवासला धरणाचे खोल पाणलोट क्षेत्र आहे. डोंगर-टेकड्यांचे अवैध खोदकाम करून रस्ते, प्लॉटिंग करण्यात आले आहे. त्यामुळे तोडलेले डोंगर, टेकड्यांच्या दरडी कोसळण्याचे प्रकार वाढले आहेत. याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे.

रस्त्यावर पडलेल्या दरडी काढून वाहतूक सुरू करण्यात येत आहे. धोकादायक ठिकाणी बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. नागरिकांच्या सुरक्षेसाठी खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

                           अजय भोसले, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग 

Back to top button