पुणे : विद्यापीठात स्वतंत्र ‘प्रवेश कक्ष’ सीबीएसईच्या विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार सुविधा | पुढारी

पुणे : विद्यापीठात स्वतंत्र ‘प्रवेश कक्ष’ सीबीएसईच्या विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार सुविधा

पुणे, पुढारी वृत्तसेवा: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) विद्यार्थ्यांना बारावीनंतरच्या पदवी प्रवेशासाठी कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने स्वतंत्र ‘प्रवेश कक्ष’ तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे यांनी ही माहिती दिली. सीबीएसईची बारावीची परीक्षा दिलेले विद्यार्थी पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशापासून वंचित राहू नयेत, म्हणून विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागात, तसेच महाविद्यालयांमध्ये गरजेप्रमाणे प्रवेश क्षमता वाढवून संबंधित विद्यार्थ्यांना सामावून घेण्यात येईल.

बारावीनंतर विद्यापीठात पुढील अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणार्‍या सीबीएसईच्या विद्यार्थ्यांची संख्या शहरी भागात जास्त असून, ग्रामीण भागात तुरळक प्रवेश होतात. विद्यापीठाला महाविद्यालयांमध्ये 10 टक्के प्रवेश वाढवून देण्याचा अधिकार आहे. हा दहा टक्के कोटा भरूनही महाविद्यालयांमध्ये सीबीएसईच्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा प्रश्न निर्माण झाला, तर संबंधित महाविद्यालयांनी तसे प्रस्ताव विद्यापीठाकडे पाठवणे गरजेचे आहे.

राज्यातील विविध विद्यापीठे आणि महाविद्यालयांची पदवी अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया सध्या सुरू आहे. दरम्यान, सीबीएसईच्या बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर होण्यास साधारण महिनाभर लागणार आहे. त्यामुळे विद्यापीठांनी पदवी अभ्यासक्रमाच्या (प्रथम वर्ष) प्रवेशाची अंतिम तारीख ‘सीबीएसई’च्या बारावीच्या निकालानंतर निश्चित करावी, असा आदेश विद्यापीठ अनुदान आयोगाने दिला आहे. या पार्श्वभूमीवर सीबीएसईच्या विद्यार्थ्यांना प्रवेशाची अडचण निर्माण होऊ नये, यासाठी विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासंदर्भात विशेष ‘प्रवेश कक्ष’ (अ‍ॅडमिशन सेल) लवकरच कार्यान्वित करण्यात येणार असल्याचेदेखील डॉ. सोनवणे यांनी स्पष्ट केले.

Back to top button