पुणे : सिंहगड उड्डाणपुलाबाबत आयुक्तांशी चर्चा करू; सुप्रिया सुळे | पुढारी

पुणे : सिंहगड उड्डाणपुलाबाबत आयुक्तांशी चर्चा करू; सुप्रिया सुळे

सिंहगड रस्ता; पुढारी वृत्तसेवा: ‘येथील वाहतूक समस्या गंभीर होत असून, त्याबाबत आयुक्तांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल,’ असे सुळे यांनी सांगितले. सिंहगड रस्त्यावरील पुलाच्या कामाची खासदार सुप्रिया सुळे यांनी पाहणी केली, त्या वेळी त्या बोलत होत्या.
या वेळी प्रकल्प अभियंता श्रीनिवास बोनाला, अधीक्षक अभियंता सुष्मिता शिर्के, राष्ट्रवादी काँग्रेसचे खडकवासला मतदारसंघाचे अध्यक्ष काका चव्हाण, कार्याध्यक्ष शरद दबडे पाटील, माजी आमदार कुमार गोसावी, माजी नगरसेवक शैलेश चरवड, बाळासाहेब कापरे, विकास दांगट, सिद्धेश बनकर, साहिल कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.

महानगरपालिका हद्दीत नवीन गावे समाविष्ट झाली आहेत. या गावांचा विकास आराखडा तयार करताना दूरदृष्टीने विचार करणे अपेक्षित असते. पाणी, रस्ते, घनकचरा या मूलभूत गरजांवर सातत्याने काम करणे अपेक्षित आहे. त्याबरोबरीने प्रत्येक भागात मुलांसाठी उद्याने, ओपन पार्क सुविधा असणे गरजेचे आहे, त्यातूनच लहान मुलांचा सर्वांगीण विकास अपेक्षित आहे, असे सुळे यांनी समाविष्ट गावांच्या अनुषंगाने खासदार म्हणून केलेल्या सूचनांची माहिती दिली.

रस्ता आणि खड्ड्यांबाबत विचारले असता त्या म्हणाल्या की, या पंचवार्षिकला असणारे स्थानिक लोकप्रतिनिधी आमच्या विचारांचे नव्हते. पूर्वी जेव्हा आमचे लोकप्रतिनिधी कार्यरत होते, तेव्हा त्यांनी तयार केलेला देखणा प्रभाग देखील आताच्या लोकप्रतिनिधींना सांभाळता आला नाही. त्यामुळे या भागाचा म्हणावा तसा विकास झाला नाही. काही गोष्टींसाठी आम्ही देखील पाठपुरावा करतो. प्रभागाच्या विकासकामांसाठी यापूर्वी देखील महापौर, आयुक्त यांच्याशी संपर्क करण्यात आला आहे.

Back to top button