पुणे विद्यापीठाचा गतवर्षीच्या तुलनेत पाच स्थानांनी दर्जा घसरला | पुढारी

पुणे विद्यापीठाचा गतवर्षीच्या तुलनेत पाच स्थानांनी दर्जा घसरला

पुणे; पुढारी वृत्तसेवा: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची ङ्गनॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रोमवर्कफ अर्थात एनआयआरएफ रँकिंगमध्ये घसरण झाली आहे. 2021 च्या तुलनेत 2022 मध्ये विद्यापीठांच्या रँकिंगमध्ये एका अंकाने, तर सर्वच शैक्षणिक संस्थांच्या रँकिंगमध्ये पाच स्थानांनी घसरण झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे विद्यापीठाचा दर्जा घसरल्याचे चित्र दिसून येत आहे. केंद्र सरकारच्या मनुष्यबळ व विकास मंत्रालयाच्या ङ्गनॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रोमवर्कफकडून दरवर्षी शैक्षणिक संस्थांची क्रमवारी जाहीर केली जाते. विविध विद्याशाखांचे शिक्षण देणार्‍या उच्च शिक्षण संस्थांचे विविध निकषांच्या आधारे मूल्यांकन केले जाते. शुक्रवारी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ही क्रमवारी जाहीर केली.

एनआयआरएफ रँकिंगमध्ये विद्यापीठाच्या कामगिरीची गेल्या वर्षाशी तुलना केली, तर 2021 मध्ये 100 विद्यापीठांच्या यादीत पुणे विद्यापीठ 11 व्या स्थानावर होते. यंदा 12 वे स्थान विद्यापीठाला मिळाले आहे. विद्यापीठांच्या यादीत जरी केवळ एकाच स्थानाची घसरण झाली असली, तरी देशस्तरावरील सर्व संस्थांची गेल्या वर्षीची तुलना केली तर गेल्या वर्षी विद्यापीठ 20 व्या स्थानावर होते. यंदा त्यात मोठी घसरण होऊन विद्यापीठ थेट 25 व्या स्थानावर घसरले आहे. या क्रमवारीत विद्यापीठाचे एकूण गुण 59.48 असून, मागील वर्षी ही गुणाची आकडेवारी 58.34 होती. त्यामुळे गुणांमध्ये किंचित वाढ असली, तरी क्रमांकात मात्र घसरण झाल्याचे दिसून आले आहे.

एकूण क्रमवारीत जरी आपण बाराव्या स्थानी असलो, तरीही सार्वजनिक विद्यापीठस्तरावरील आपले दुसर्‍या क्रमांकाचे स्थान, राज्यातील पहिले स्थान पूर्वीप्रमाणेच आहे. कोरोनामुळे आपली राज्याबाहेरील व परदेशी विद्यार्थ्यांची संख्या घटल्याने, विद्यार्थी शिक्षक गुणोत्तर हलल्याने एकत्रित गुणांमध्ये फरक पडलेला दिसतो. परंतु, मला आशा आहे की, आपण आधीच्या क्रमवारीच्याही पुढे जात पुढील काळात आणखी चांगले काम करू.

                       – डॉ. कारभारी काळे, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

कोलकात्याचे जाधवपूर विद्यापीठ हे सार्वजनिक विद्यापीठात देशात प्रथम आहे. मात्र, तेथे शिक्षकांची संख्या 1200 आहे, तर आपल्याकडे मंजूर शिक्षक 368 असून, त्यातील 50 टक्के जागा रिक्त आहेत. त्यामुळे रँकिंगमध्ये सुधारणा करण्यासाठी राज्य सरकारचे सहकार्य गरजेचे आहे. त्यासाठी पदे वाढवून रिक्त पदेदेखील भरणे गरजेचे आहे.

                       – डॉ. संजीव सोनवणे, प्र-कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ.

Back to top button