अनिल भोसले यांच्या जागेची पुणे बाजार समितीकडून खरेदी | पुढारी

अनिल भोसले यांच्या जागेची पुणे बाजार समितीकडून खरेदी

पुणे; पुढारी वृत्तसेवा: आर्थिक अनियमितता आणि गैरव्यवहारांमुळे अवसायनात काढण्यात आलेल्या येथील शिवाजीराव भोसले सहकारी बँकेचे संचालक अनिल शिवाजीराव भोसले यांच्या कर्जखात्यांतर्गत असलेल्या मौजे कोरेगाव मूळ (ता. हवेली, जि. पुणे) यांच्या ताब्यातील 5 हेक्टर 52 आर जमिनीची अखेर लिलावात विक्री झाली आहे. तब्बल 60 कोटी 41 लाख 74 हजार 709 रुपयांमध्ये पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीने ही जागा जाहीर लिलावाने खरेदी केली असल्याची माहिती सहकार उपनिबंधक व बँकेचे अवसायक डॉ. आर. एस. धोंडकर यांनी दिली. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 101 अन्वये वसुली दाखल्यास अनुसरून बँकेच्या वसुली
अधिकार्‍यांनी अनिल भोसले यांची मौजे कोरेगाव येथील तीन सर्व्हे नंबर, गट नंबरमधील जागा पोटखराब्यासह जप्त केली होती.

त्यामध्ये गट नंबर 201/2 (2-25 हेक्टर), गट नंबर 330/अ/2 (01-81 हेक्टर) आणि गट नंबर 328 (01-46 हेक्टर) अशी एकूण 5.52 हेक्टर जमिनीचा समावेश आहे. त्यानंतर येथील अतिरिक्त सत्र विशेष न्यायाधीशांनी (एमपीआयडी कोर्ट) ही मिळकत जाहीर लिलावाद्वारे विक्री करण्याबाबत 17 फेब्रुवारी 2022 रोजीच्या आदेशान्वये परवानगी दिलेली होती. त्यानुसार, बँकेने संबंधितांना प्रथम जाहीर लिलाव नोटीस वृत्तपत्रात प्रकाशित करून 25 मार्च 2022 रोजी लिलाव ठेवला असता कोणीही बोलिदार उपस्थित नव्हते. त्यामुळे लिलाव तहकूब करण्यात आला. दुसरा लिलावही वृत्तपत्रात जाहिरात देऊन 20 एप्रिल 2022 रोजी ठेवला असता पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीशिवाय कोणीही बोलीदार न आल्याने तहकूब करण्यात आला.

तर तिसरा जाहीर लिलाव 26 मे 2022 रोजी ठेवण्यात आला असता, कोणीही बिडर, बोलीदार लिलावात उपस्थित नव्हते, असे त्यांनी स्पष्ट केले. सहकार कायद्यान्वये तीन वेळा जाहिररित्या लिलाव करूनही मालमत्ता विक्री न झाल्यामुळे जिल्हा उपनिबंधकांनी राखीव किंमतीच्या 20 टक्के कमी दराने त्रास मूल्य (डिस्ट्रेस व्हॅल्यू) या किंमतीस मान्यता घेऊन 15 जून 2022 रोजी वृत्तपत्रात जाहीर नोटीस दिली आणि शुक्रवार, दिनांक 15 जुलै 2022 रोजी जाहीर लिलाव ठेवण्यात आला होता. या लिलावामध्ये पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती व माणिक दत्तात्रय गोते यांनी सहभाग घेतला. लिलावाची राखीव किंमत 59 कोटी 63 लाख 25 हजार 600 रुपये ठेवण्यात आली होती.

राखीव किंमतीपेक्षा अधिक रकमेने हा लिलाव अंतिम झाला असून 60 कोटी 41 लाख 74 हजार 709 रुपये या किंमतीस पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीने जाहीर लिलावाद्वारे जागेची खरेदी केली आहे. त्यापोटी 15 टक्के रक्कम त्यांनी जमा केली असून, उर्वरित रक्कम एक महिन्यात जमा करावयाची आहे. जमीन विक्रीतून प्राप्त रक्कम एमपीआयडी कोर्टाच्या आदेशाप्रमाणे न्यायालयामध्ये जमा करण्यात येणार आहे. त्यानंतर न्यायालयास विनंती करून प्राप्त होणारी रक्कम ठेव विमा महामंडळाकडे (डीआयसीजीसी) वर्ग करण्यात येईल. या लिलावामुळे उपलब्ध होणार्‍या रकमेमुळे बँकेच्या ठेवीदारांना काहीसा दिलासा मिळण्याची अपेक्षा असल्याचे डॉ. धोंडकर यांनी सांगितले.

  • कोरेगाव मूळ येथील 5 हेक्टर 52 गुंठे जमिनीची लिलावात तब्बल 60 कोटी 41 लाख रुपयांनी केली खरेदी

शिवाजीराव भोसले बँकेकडून घोषित जागेच्या जाहीर लिलावात पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीने 5.52 हेक्टर जमीन खरेदी केलेली आहे. यामुळे समितीच्या मार्केट यार्डातील गूळ-भुसार व भाजीपाला विभागावर येणारा ताण कमी होईल. या जागेवर उपबाजार विकसित करण्यात येईल. वाढत्या नागरीकरणाचा विचार करता शेतकर्‍यांना शेतमाल विक्रीसाठी आणि तेथील ग्राहकांना शेतीमाल खरेदीसाठी सोय होणार आहे.

                                 – मधुकांत गरड, प्रशासक, पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती

Back to top button