नगर : हल्ल्यातील आरोपी अजून मोकाटच | पुढारी

नगर : हल्ल्यातील आरोपी अजून मोकाटच

नगर : पुढारी वृत्तसेवा : महापालिकेचे अतिक्रमण विरोधी पथक मंगळवारी दुपारी जुने जिल्हाधिकारी कार्यालय ते बूथ हॉस्पिटल दरम्यानची अतिक्रमणे काढत असताना, अचानक अतिक्रमण विरोधी पथकावर दगडफेक झाली. याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात 15 जणांविरुद्ध खुनाचा प्रयत्न, सरकारी कामात अडथळा कलमान्वये गुन्हा दाखल झाला. मात्र, गुन्हा दाखल होऊन दोन दिवस झाले, तरी अद्याप आरोपी मोकाटच आहेत.

महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी विभागाकडे आलेल्या तक्रारीनुसार अतिक्रमणविरोधी पथक मंगळवारी दुपारी प्रभाग समिती चार मधील जुने जिल्हाधिकारी कार्यालय ते बूथ हॉस्पिटल दरम्यान असलेली अतिक्रमणे काढण्यासाठी गेले होते. बाबा बंगाली येथे हिंदुस्तान गॅरेज शेजारील पत्र्याच्या शेडचे अतिक्रमण पथकातील कर्मचारी जेसीबी घेऊन अतिक्रमणे पाडण्याची कार्यवाही करीत होते.

त्यावेळी तिथे 40 ते 50 लोक जमा झाले. त्यापैकी 15 लोकांनी अतिक्रमण काढण्यास विरोध केला आणि कर्मचार्‍यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर अचानक अतिक्रमणविरोधी पथकावर दगडफेक सुरू केली. अतिक्रमण विरोधी पथकातील कर्मचार्‍यांना काहीवेळ काहीच कळत नव्हते. नेमके दगडफेक कोण करीत आहेत, हे समजत नव्हते. या दगडफेकीत एक कर्मचारी गंभीर जखमी झाला.
याप्रकरणी या घटनेनंतर प्रभाग समिती अधिकारी मेहेर लहारे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला. मात्र, गुन्हा दाखल होऊन दोन दिवस झाले तरी, अद्याप कोतवाली पोलिसांना आरोपीचा सुगावा लागलेला नाही.

कामगार संघटनेेचे अवसान गेले!
अतिक्रमण विरोधी पथकावर हल्ला झाल्यानंतर मनपा कामगार संघटनेने दुसर्‍या दिवशी काम बंद आंदोलन केले. आरोपींना अटक होईपर्यंत काम बंद ठेवणार अशी वल्गनाही करण्यात आली. मात्र, रात्रीतून काय खलबते झाली कोणास ठाऊक. दुसर्‍याच दिवशी मनपाचे कामकाज सुरळीत सुरू झाले. शेवटी कामगारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न मागे पडला, असे बोलले जात आहे.

त्या’ गुन्ह्यातील आरोपी असे
सादिक बाबूलाल शेख, सोफीयान सादिक शेख, अजहर सादीक शेख, अजिल सादीक शेख, आसिफ नूरमोहमंद कुरेशी, शहेबाज जब्बार कुरेशी, निसार तांबोळी, अमजद जब्बार कुरेशी, निसार कुरेशी (भांगारवाला, सर्व रा. झेंडीगेट व बाबा बंगली परिसर) यांच्यासह अनोळखी सहा जणांचा आरोपींमध्ये समावेश आहे.

बैल गेला अन् झोपा केला..!
शहरातील धोकादायक इमारत पाडणे असो अथवा अतिक्रमण हटविणे असो, तिथे पोलिस बंदोबस्त मागविला जातो. पोलिसांकडूनही बंदोबस्त दिला जातो. मात्र, बाबा बंगाली परिसरातील अतिक्रमण काढताना पोलिस बंदोबस्त नव्हता. पथकातील प्रमुख अधिकारीही जागेवर नव्हते. मग, कर्मचार्‍यांच्या सुरक्षितेचे काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. कामगारांनी आयुक्तांनी भेट घेतल्यानंतर पोलिस बंदोबस्ताविना कारवाई नाही असा आदेश काढला. त्यामुळे ‘बैल गेला अन् झोपा केला’ अशी मनपाची अवस्था झाली आहे.

अतिक्रमणविरोधी पथकावर झालेल्या हल्ल्यातील आरोपींच्या अटकेसाठी स्वतंत्र पथक रवाना केले आहेत. लवकरच आरोपींना गजाआड करण्यात येईल.
संपत शिंदे,
पोलिस निरीक्षक, कोतवाली

Back to top button