ऐन पावसाळ्यात पाण्यासाठी वणवण | पुढारी

ऐन पावसाळ्यात पाण्यासाठी वणवण

कात्रज; पुढारी वृत्तसेवा: वडगाव जलशुद्धीकरण केंद्रावर तांत्रिक बिघाड झाल्याने पाणीपुरवठा खंडित झाला होता. ऐन पावसाळ्यात नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागल आहे. त्यामुळे नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत होती. विजेच्या 22 केव्ही ब्रेकरमध्ये बिघाड झाल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे पाणीपुरवठा झाला नाही. वडगाव पंपिग स्टेशनवरून पाणीपुरवठा होणार्‍या कात्रज, धनकवडी, कोंढवा, आंबेगाव, नर्‍हे परिसरात पाणीपुरवठा न झाल्याने नागरिक त्रस्त झाले.

22 केव्ही ब्रेकरमध्ये बिघाड होऊन इन्सुलेटर दुरुस्तीसाठी पाठवला होता. शहरासह उपनगरांत जोरदार पाऊस सुरू असल्याने अडथळ्यात भर पडली. त्यामुळे पाणीपुरवठा होण्यास अडचणी निर्माण झाल्या. मंगळवारी वडगाव पंपिग स्टेशनवरील पाचपैकी चार पंपाद्वारे आम्ही सुरळीत पाणीपुरवठा केला असून, उर्वरित एका पंपाचे काम चालू आहे. उर्वरित एका पंपाचे कामही लवकरच होईल, असे शाखा अभियंता जालिंदरसिंह राजपूत यांनी सांगितले.

वडगाव जलशुद्धीकरण केंद्रात तांत्रिक बिघाड झाल्याने पंपिग स्टेशनवरून टाक्यांना पाणीपुरवठा झाला नाही. परंतु, मंगळवारी तांत्रिक बिघाड दुरुस्त झाल्याने पंपिग स्टेशनवरून पाणीपुरवठा झाला आहे, त्यामुळे बुधवारपासून कात्रज आणि परिसरात नागरिकांना दिलेल्या वेळेत पाणीपुरवठा होईल.

                                                  -संदीप मिसाळ, कनिष्ठ अभियंता, पाणीपुरवठा

 

Back to top button