कात्रज घाटात पुन्हा दरड कोसळली | पुढारी

कात्रज घाटात पुन्हा दरड कोसळली

कात्रज; पुढारी वृत्तसेवा: कात्रज घाटात दरड कोसळल्याची गेल्या आठवड्यातील घटना ताजी असतानाच बुधवारी दुपारी एकच्या सुमारास पुन्हा एकदा दरड कोसळत मोठे दगड रस्त्यावर आले. जोरदार पाऊस व दुपारची वेळ असल्याने वाहतूक तुरळकच होती. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. मात्र, वाहनचालकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. दरड कोसळू नये, यासाठी कोणतीही उपाययोजना शासकीय यंत्रणेने केली नाही. त्यामुळे पुन्हा दरड कोसळण्याची घटना घडली.

कात्रज घाटात दरड कोसळण्याची माहिती मिळताच भिलारेवाडी येथील स्वप्निल काशीद स्वतःचा जेसीबी घेऊन घटनास्थळी गेले. रस्त्यावर आलेले मोठे दगड बाजूला करीत त्यांनी वाहतूक सुरळीत केली. धनकवडी-सहकारनगर क्षेत्रीय कार्यालय आपत्ती व्यवस्थापन पथक जेसीबी घेऊन घटनास्थळी पोहचले. रस्त्यावर आलेली झाडे व दगड बाजूला केले, असे सहायक आयुक्त विजयकुमार वाघमोडे यांनी सांगितले.

आणखी दगड कोसळण्याचा धोका
कात्रज घाट परिसरात गेला आठवडाभर जोरदार पाऊस सुरू आहे. यामुळे माती वाहून गेल्याने मोठे दगड मोकळे होऊन रस्त्यावर येत आहेत. काही झाडांची मुळे देखील मोकळी झाली आहेत. त्यामुळे वारंवार दरड, झाडे कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. ज्या ठिकाणी दरड कोसळली त्या ठिकाणी आणखी काही मोठे दगड मोकळे झाले असून, ते काढणे गरजेचे आहे. कारण पुन्हा दरड कोसळण्याची शक्यता आहे.

Back to top button