पुणे : तारांबळ; संततधारेमुळे नागरिक त्रस्त; रस्त्यारस्त्यावर साचली तळी | पुढारी

पुणे : तारांबळ; संततधारेमुळे नागरिक त्रस्त; रस्त्यारस्त्यावर साचली तळी

पुणे; टीम पुढारी: सलग सात दिवसांपासून कोसळणार्‍या पावसाने बुधवारीही संपूर्ण शहराला झोडपले. त्यामुळे रस्त्यारस्त्यावर पाण्याची तळी साचली होती, साहजिकच निर्माण झालेल्या वाहतूक कोंडीने वाहनचालक मेटाकुटीला आलेे. शहरभर अग्निशामक दलाची धावपळ उडाली. अनेक घरांंमध्ये पाणी शिरले होते. काही भागांत झाडपडीच्याही घटना घडल्या. त्यातच आणखी दोन दिवस शहराला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्याने नागरिक पुरते हैराण झाले आहेत. दरम्यान, जून व जुलै महिन्यात आता अवघ्या 6 टक्के पावसाची तूट आहे. ती दोनच दिवसांत भरून निघेल, अशी शक्यता आहे.

अप्पर डेपो रोड, येरवड्यातील काही भाग, बीएमसीसी रोड, चंदननगरमधील काही भाग, हरिगंगा सोसायटीसमोर मोठ्या प्रमाणावर पाणी साठले होते. त्यातून नागरिक आणि विद्यार्थी वाट शोधत होते. स्वारगेट ते हडपसर, कात्रज ते स्वारगेट, सिंहगड रोड ते स्वारगेट, स्वारगेट ते शिवाजीनगर, शिवाजीनगर ते स्वारगेट, अशा विविध ठिकाणी वाहतूक धीम्या गतीने पुढे सरकत होती. यात पोलिसांनी तसेच नागरिकांनी ठिकठिकाणी साठलेल्या पाण्याला वाट करून दिली.शहरात ठिकठिकाणी खड्ड्यांमुळेही वाहतूक धीम्या गतीने पुढे सरकताना पाहायला मिळाली.

त्यातच हडपसर येथील बी. टी. कवडे रस्ता, कर्वेेनगर येथील बीएमसीसी कॉलेजजवळ, कोरेगाव पार्क येथील लेन नंबर 4 येथे, कसबा पेठ, हडपसर येथील रॅम्प वर्कशॉप, सुखसागरनगर येथील बीएसएनएल कार्यालयाजवळ, टिळक रस्त्यावरील स्टेट बँकेसमोर, सोमवार पेठेतील ताराचंद हॉस्पिटलजवळ, नरपतगिरी चौक येथे, रेसकोर्स येथील गुरुद्वार्‍याजवळ, सिंहगड रस्त्यावरील सरितानगरी येथे, कात्रज येथील जुन्या बोगद्याजवळ, कसबा पेठेतील सायकल दवाखान्याजवळ, प्रभात रोडवरील कमला नेहरू पार्कजवळ, कसबा पेठेतील कुंभारवाड्याजवळ, बोपोडी येथील रेल्वेक्रॉसिंगजवळ, त्याचबरोबर भांडारकर रस्त्यावरील अजित हॉटेलसमोर झाडे पडली. यामुळेही वाहतूक कोंडी झाली. या वेळी नागरिक तसेच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन ही झाडे बाजूला करण्याचे काम केले. बुधवारी सकाळी 7 ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत शहरात 20 हून अधिक ठिकाणी झाडे पडली.

सुरक्षितस्थळी हलविले
संगम पुलाजवळ, आरटीओ कार्यालयाजवळील दर्ग्याजवळ पाण्यामध्ये लोक अडकल्याची माहिती अग्निशामक दलाला मिळाली होती. जवानांनी घटनास्थळी धाव घेत येथे अडकलेल्या लोकांना सुरक्षित स्थळी हलविले. त्याचबरोबर चंदननगरमधील विडी कामगार वसाहत येथे घरांमध्ये पाणी शिरल्याने अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेतली.

पोलिसांनी करून दिला पाण्याला रस्ता
शहरात ठिकठिकाणी रस्त्यावर पाणी साचल्यामुळे वाहतूक कोेंडी होत होती. या वेळी स्वतः वाहतूक पोलिसांनी पाण्याला पर्यायी वाट करून देत वाहतूक नियमन केले. कोरेगाव पार्क परिसरातील डायमंड चौकात पाणी साचल्यामुळे वाहतुकीला अडथळा झाला होता. तेथे पोलिसांनी वॉटर लॉकिंग काढून वाहतूक सुरळीत केली. तसेच बंडगार्डन परिसरातील सर्किट हाऊसशेजारील चौकाजवळ साधू वासवानी पुलाच्या सुरुवातीला मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते. त्यामुळे वाहतूक मंदगतीने सुरू होती. भैरोबा नाल्यापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या. त्या वेळी बंडगार्डन विभागाचे पोलिस कर्मचारी लक्ष्मण बांगर, दत्तात्रय घोडके यांनी टिकाव, फावड्याने पाण्याला वाट करून दिली.

Back to top button