जलपर्णीची ढकलाढकली! | पुढारी

जलपर्णीची ढकलाढकली!

कसबा पेठ : पुढारी वृत्तसेवा : महापालिका प्रशासनाकडून  नदीपात्रातून काढण्यात आलेल्या जलपर्णी पुन्हा नदीपात्रात फेकण्याचे प्रकार सुरू असल्याचे समोर आले. खडकवासला धरणातून मुठा नदीच्या पात्रात सुरू असलेल्या विसर्गाबरोबरच खडकवासला, शिवणे या परिसरातून पाण्याबरोबरच मोठ्या प्रमाणात जलपर्णी वाहून आल्याने नदीपात्रातील भिडे पुलालगत तसेच सिद्धेश्वर घाटावरील पुलावर वाहून आलेली जलपर्णीचे ढीग मंगळवारी दिसून आले. मात्र महापालिका प्रशासनाकडून भिडे पूल तसेच सिद्धेश्वर घाटावरील अडकलेली जलपर्णी हटविण्याऐवजी कर्मचारी क्रेनच्या साह्याने जलपर्णी उचलून मुठा नदीने बाहेर फेकलेली

जलपर्णी पुन्हा मुठा नदीत पाण्याच्या प्रवाहात सोडून देत होते. त्यामुळे एका ठिकाणाहून ढकललेली जलपर्णी दुसर्‍याजागी अडकत होती. तरीही प्रशासनाचे ढकला-ढकलीचे काम सुरू होते, हीच जलपर्णी पुढे वाहत जात शिवाजी पूल, डेंगळे पूल, संगम घाट, बंडगार्डन घाटावर साठत असल्याचे चित्र आज दिवसभर दिसून आले.

नदीपात्रातील रस्त्यावर खासगी पार्किंग

पावसाळ्यात 7 जून ते 30 सप्टेंबर या कालावधीत मुठा नदी पात्रातील रस्त्यावर कोणतीही वाहने पार्क करण्यास मज्जाव आहे. तसा महानगरपालिकेने नदीपात्रात ठिकठिकाणी तसे फलकही लावले आहेत, मात्र याकडे दुर्लक्ष करत नदीपात्रातील रस्त्यांवर खासगी शाळांच्या वाहनांसह इतर वाहने सर्रासपणे पार्क केलेली दिसतात.  जून महिन्यात बहुतांशी सर्वच शाळा सुरू झाल्या.  मुलांना शाळेत सोडल्यानंतर स्कूल व्हॅन शाळा सुटेपर्यंत नदीपात्रात बिनधास्तपणे पार्क केल्या जातात. वास्तविक पावसाळ्यात नदीपात्रात वाहने पार्क करणे धोक्याचे आहे. मात्र ओंकारेश्वर घाटाजवळील मुठा नदीपात्रातील रस्त्यावर खासगी शाळांची, स्थानिक नागरिकांची तसेच ट्रॅव्हल्स कंपनीच्या गाड्या बिनधास्तपणे पार्क केल्या जातात.

Back to top button