पुणे : सोमेश्वरला राडारोड्याचा विद्यार्थ्यांना त्रास | पुढारी

पुणे : सोमेश्वरला राडारोड्याचा विद्यार्थ्यांना त्रास

सोमेश्वरनगर : पुढारी वृत्तसेवा : सोमेश्वरनगर येथील सोमेश्वर विद्यालयाचा रस्ता समस्याग्रस्त झाला असून, अशातच संततधार पावसाने रस्ता चिखलमय होऊन अक्षरशः घसरगुंडीचे स्वरूप आले आहे. परिणामी, हजारो विद्यार्थ्यांना या चिखलमय रस्त्यावरून जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.

एकीकडे बारामती तालुक्यात करोडो रुपयांचा निधी येत असताना ग्रामीण भागातील रस्त्यांच्या कामाबाबत उदासीनता दिसून येत आहे. अनेक वर्षांपासून या रस्त्याचे काम रखडले असून, तो दुरुस्त होण्यासाठी प्रशासन कोणता मुहूर्त पाहत आहे हे न समजणारे कोडे आहे.
सोमेश्वर कारखाना ते वाघळवाडीदरम्यान अवघ्या दोन किलोमीटरचा हा रस्ता सध्या खड्ड्यात गेला आहे.

गेल्या चार दिवसांपासून परिसरात पावसाची संततधार सुरू आहे. पावसामुळे रस्त्यावर चिखल झाला आहे. रस्त्यावरून सोमेश्वर विद्यालय, मु. सा. काकडे महाविद्यालयात शिक्षणासाठी हजारो विद्यार्थी जीव मुठीत धरून प्रवास करतात. प्राथमिक शाळा, आरोग्य उपकेंद्र आणि वाघळवाडी ग्रामस्थ या रस्त्यावर ये-जा करतात. सोमेश्वर कारखान्याच्या गाळप हंगामात या रस्त्यावरून उसाने भरलेले ट्रक आणि ट्रॅक्टर यांचीही वाहतूक सुरू असते.

मोठ्या अपघाताची वाट पाहताय का?

पावसाळ्यात एखादा मोठा अपघात झाल्यानंतरच संबंधित विभाग रस्ता दुरुस्त करणार का? असा सवाल प्रवासी विचारत आहेत. जिल्हा परिषद आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

Back to top button