बीआरटी स्थानकामध्ये चिखलाचे साम्राज्य | पुढारी

बीआरटी स्थानकामध्ये चिखलाचे साम्राज्य

वाघोली : पावसामुळे वाघोली येथील बीआरटी टर्मिनल स्थानक पूर्णतः चिखलमय झाल्यामुळे मोठी दुरवस्था झाली आहे.
स्थानकातील कचरा, साचलेले पाणी, डास, माशा आदी समस्यांचा प्रवाशांना सामना करावा लागत असल्याने प्रचंड हाल होत आहेत.
वाघोली येथील केसनंद फाटा येथे बीआरटी स्थानक सुरू होऊन तीन वर्षांचा कालावधी उलटला.

मात्र, अद्यापही प्रवाशांसाठी सोईसुविधा उपलब्ध करून देण्यास प्रशासनाडून दिरंगाई होत आहे. स्थानक झाल्यानंतर लगेच निगडीच्या धर्तीवर स्थानक करण्यात येईल, असे आश्वासन बीआरटी प्रशासनाकडून देण्यात आले होते. निगडीच्या धर्तीवर होणारे स्थानक तर झाले नाहीच, परंतु प्रवाशांसाठी आवश्यक असणार्‍या सुविधादेखील उपलब्ध करून देण्यास प्रशासन उदासीन असल्याचे दिसून येते.

कचरा, मोकाट कुत्री व डुकरांचा वावर त्याचबरोबर बीआरटी स्थानकामध्ये साचलेली पाण्याची डबकी, चिखल, कचरा आदी समस्यांमुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. प्रवाशांना बस येईपर्यंत वाट पाहत स्थानकावर थांबावे लागते. स्थानक कचर्‍याच्या विळख्यात सापडल्यामुळे प्रवाशांना दुर्गंधीचासुद्धा मोठा सामना करावा लागत आहे.

Back to top button