पिंपरी : रेडियम आर्टिस्ट अडचणीत | पुढारी

पिंपरी : रेडियम आर्टिस्ट अडचणीत

नंदकुमार सातुर्डेकर : 
पिंपरी : केंद्र सरकारने तीन वर्षांपूर्वी वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बसविण्याचा निर्णय घेतल्याने वाहने रजिस्ट्रेशन, नंबर प्लेट लावल्याशिवाय शोरूममधून बाहेर येऊ शकत नाहीत. मात्र, वाहने नंबर प्लेटसह शोरूममधूनच येऊ लागल्याने स्थानिक रेडियम आर्टिस्ट अडचणीत आले आहेत.

कालानुरूप पेंटिंग व्यवसायातही मोठ्या प्रमाणात बदल झाले आहेत. पूर्वी हाताने पेंटिंग केले जात होते. त्यानंतर रेडियमचे कामही हाताने केले जात होते. नंतर संगणकावर केले जाऊ लागले. वाहनांवरील नंबर प्लेटचे काम हा रेडियम आर्टिस्टच्या उत्पन्नाचा मोठा स्त्रोत होता मात्र तीन वर्षांपूर्वी केंद्र सरकारने हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (एच एस आर टी) बसविण्याचा निर्णय केला देशभर तो लागू झाला रजिस्ट्रेशन प्लेट पडल्याशिवाय वाहन बाहेर येऊ देऊ नये असे आदेश असल्याने रेडियम आर्टिस्ट अडचणीत आले आहेत.

गेल्या तीन वर्षापासून सरकारने हा निर्णय बदलावा यासाठी रेडियम आर्टिस्ट संघटनेचा पाठपुरावा सुरू आहे. मात्र, त्याला यश येत नसल्याने रेडियम आर्टिस्ट अस्वस्थ आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये सुमारे दीडशे रेडियम आर्टिस्ट आहेत. गाड्यांचे नंबर प्लेट शोरूममधूनच लावून येत असल्याने या रेडियम आर्टिस्टना आता केवळ गाड्यांवर नावे, तसेच देवदैवतांचे फोटो टाकून देणे, एवढेच काम उरले आहे.

याबाबत आवाज उठवत असतानाच, तूर्त आहे, त्यात समाधान मानून हातातील काम करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.
टू व्हीलरसाठी त्यावेळी पुढेमागे नंबर प्लेटसाठी प्रत्येकी 50 रुपयांपासून 500 रुपयांपर्यंत आकारले जात होते. फोर व्हीलरसाठी प्रायव्हेट फोर व्हीलर असेल तर पाचशे ते एक हजार रुपये आकारले जात होते.

 

कमर्शियल वाहन असेल तर तिप्पट पैसे मिळत होते. आता एजन्सीकडूनच वाहनांवर नंबरप्लेट बसवून येत असल्याने स्थानिक रेडियम व्यावसायिक अडचणीत आले आहेत. या संदर्भात पिंपरी चिंचवड रेडियम असोसिएशनमार्फत वेळोवेळी आवाज उठवला. मात्र, यश आले नाही.
-दीपक ढेरंगे,रेडियम आर्टिस्ट, खराळवाडी

केंद्र सरकारने हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बसविण्याचा निर्णय घेतला.तो देशभर लागू झाल्याने पिंपरी चिंचवडमध्येही त्याची अंमलबजावणी करण्यात येत आहे.
-मनोज ओतारी,सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी

Back to top button