पुणे : भीमाशंकर अभयारण्यात रस्ता चुकलेल्या तरुणांची सुटका | पुढारी

पुणे : भीमाशंकर अभयारण्यात रस्ता चुकलेल्या तरुणांची सुटका

मंचर : पुढारी वृत्तसेवा : श्रीक्षेत्र भीमाशंकर अभयारण्यात दाट झाडी, धुके तसेच मुसळधार पावसात ट्रेकिंग करताना सहा तरुण रस्ता चुकले. सोमवारी दि. 11 रोजी पहाटे त्यांची सुटका घोडेगाव पोलिस व स्थानिक ग्रामस्थांनी केली.

घोडेगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुरबाड येथून पवन अरुण प्रतापसिंग (वय 26), सर्वेश श्रीनिवास जाधव, निरज राजाराम जाधव, दिनेश धर्मराज यादव, अंकुश सत्यप्रकाश तिवारी, हितेश श्रीनिवास यादव (सर्व रा. उल्हासनगर, मुंबई) येथील तरुण बैलघाटमार्गे भीमाशंकर येथे ट्रेकिंगसाठी निघाले होते. दरम्यान भीमाशंकर येथे मुसळधार पाऊस व धुक्यामुळे रविवारी (दि. 10) सायंकाळी 5 वाजता अंधार पडला होता. अंधारात हे ट्रेकर रस्ता भरकटले होते.

जंगलातील अशा ठिकाणावर ते होते की, त्यांना वरही जाता येत नव्हते व खालीही येता येत नव्हते. ते एका जागेवर थांबले असताना काही वेळानंतर त्यांच्या मोबाईलला रेंज आली. त्यानंतर त्यांनी घोडेगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक जीवन माने यांच्याशी संपर्क साधला. पोलिसांनी भीमाशंकर येथील स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्यांना बाहेर काढले. सदर कामगिरीसाठी भीमाशंकरचे पोलिस मित्र सागर कैलास मोरमारे, सूरज तुकाराम बुरुड यांच्या मदतीने घोडेगाव पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक जीवन माने, पोलिस उपनिरीक्षक चव्हाण, पोलिस जवान गवारी, होमगार्ड कानडे आदींनी शोधकार्य यशस्वीपणे पूर्ण केले.

दिवसा लख्ख उजेडातच ट्रेकिंग करा : जीवन माने

भीमाशंकर परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असून धुक्याचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे तरुण व पर्यटकांनी रात्रीच्या वेळी पर्यटन व ट्रेकिंग न करता दिवसाढवळ्या लख्ख सूर्यप्रकाशातच प्रवास व ट्रेकिंग करावे, असे आवाहन घोडेगाव पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक जीवन माने यांनी केले.

Back to top button