पुणे : आळंदी-लोणीकंद रस्त्याची लागली वाट | पुढारी

पुणे : आळंदी-लोणीकंद रस्त्याची लागली वाट

आळंदी : पुढारी वृत्तसेवा : पहिला खड्डा चुकवत नाही तोच गाडी दुसर्‍या खड्ड्यात आदळते… अचानक ब्रेक दबावा लागतो… त्यामुळे मागून येणारी भरधाव वाहने धडकण्याची शक्यता… शिवाय रस्त्यावर वाहनांची लागलेली रांग कायमचीच… यामुळे त्रस्त झालेले वाहनचालक… ही व्यथा आहे आळंदी ते लोणकंद फाटा प्रवास करणार्‍या वाहनचालकांची.

या रस्त्यावर आळंदी, चर्‍होली फाटा, धानोरे फाटा, सोळु, गोलेगाव फाटा, कमळजाई नगर, मरकळ, तुळापूर, फुलगाव फाटा, लोणकंद फाटा आदी ठिकाणी दीड ते दोन फुटांचे खोल खड्डे पडले आहेत. वाहनचालकांना या धोकादायक खड्ड्यांमधून वाट काढत प्रवास करावा लागत आहे. गेल्या वर्षीच दुरुस्त करण्यात आलेल्या सदर रस्त्यावर पहिल्याच पावसात खड्डे पडल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामावर प्रश्न उपस्थित होत आहे.

खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने अपघात घडत आहेत. खड्ड्यांची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे. तीर्थक्षेत्र आळंदी देवाची व अहमदनगर-पुणे महामार्ग यांना जोडणारा सदर रस्ता असल्याने या रस्त्यावरून वाहनांची मोठी वर्दळ असते. नगर, सोलापूर, पूर्व पुणे या भागातून आळंदी शहरात प्रवेश करण्यासाठी जवळचा रस्ता म्हणून या रस्त्याला वाहनचालक प्राधान्य देतात. अवघ्या अर्धा – पाऊन तासात पार होणार्‍या रस्त्यावर दीड तास लागत आहे. या भागात औद्योगिक वसाहत असल्याने जड वाहनेदेखील मोठ्या प्रमाणात ये-जा करीत असतात. यामुळे हा रस्ता तातडीने दुरुस्त करण्याची मागणी होत आहे.

छत्रपती संभाजीराजे पुलावर मोठे खड्डे

हवेली व खेड तालुक्याला जोडणार्‍या तुळापूर-मरकळ येथील इंद्रायणी नदीवरील छत्रपती संभाजीराजे पुलावर मोठे खड्डे पडले आहेत. यामुळे पुलाच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. खड्ड्यांमुळे पुलावर अपघात होत आहेत. अरुंद पूल असल्याने वाहतूक कोंडीदेखील होत आहे. प्रशासनाने या ठिकाणी फलक लावला असून, पर्यायी मार्गाचा वापर करावा, अशा सूचना त्यावर देण्यात आल्या आहेत. मात्र, दुरुस्तीकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.

Back to top button