पाणीपट्टीवरील खर्च 120 कोटींनी वाढणार; ‘जलसंपदा’ने पाण्याचे दर वाढवले | पुढारी

पाणीपट्टीवरील खर्च 120 कोटींनी वाढणार; ‘जलसंपदा’ने पाण्याचे दर वाढवले

पुणे; पुढारी वृत्तसेवा: जलसंपदा विभागाने सर्वच प्रकारच्या पाणीपट्टीचे दर वाढविले आहेत. त्यामुळे पुणे महापालिकेचा पाणीपट्टीवरील खर्च 80 कोटींवरून 200 कोटीवर जाणार आहे. पाणीपट्टीची दरवाढ जुलै महिन्याच्या एक तारखेपासून गृहीत धरण्यात येणार असल्याचे पत्र जलसंपदा विभागाने महापालिकेला पाठविले आहे. पुणे शहराला खडकवासला, टेमघर, पानशेत आणि वरसगाव या धरणांतून पाणीपुरवठा करण्यात येतो. चारही धरणे जलसंपदा विभागाकडे आहेत. त्यामुळे महापालिकेला जलसंपदा विभागाला दरवर्षी पाणीपट्टी द्यावी लागते. त्यानुसार महापालिका जुन्या दरानुसार वर्षाला 70 ते 80 कोटी रुपये जलसंपदा विभागाला पाणीपट्टी देत होती.

आता मात्र, जलसंपदा विभागाने पिण्यासाठी आणि औद्योगिक वापरासाठीच्या पाणीपट्टी दरात दुप्पट वाढ केली आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाला 100 ते 120 कोटी रुपयांचा अतिरिक्त खर्च करावा लागणार आहे. येत्या 1 जुलैपासून नवीन दर लागू होतील, असे पत्र जलसंपदा विभागाने महापालिकेला दिले आहे.

महानगरपालिका जलसंपदा विभागाच्या विविध प्रकल्पातून सद्य:स्थितीत सरासरी दररोज 1742 एमएलडी पाणी घेते. महापालिकेला 2021-22 च्या वार्षिक पाण्याच्या अंदाजपत्रकासाठी 11.835 टीएमसी पाणीपुरवठा मंजूर करण्यात आला आहे. असे असले तरी शहराला अधिक पाणी लागत असल्यामुळे वर्षाला 22.45 टीएमसी इतका पाणी वापर करण्यात येतो. शहराला 1.39 टीएमसी इतका औद्योगिक वापर मंजूर आहे. त्यामुळे जलसंपदा विभाग कायमच पुण्याच्या अतिरिक्त पाणी वापरावर आक्षेप घेत आला आहे.

नवीन पाण्याचे दर
महापालिकांना सध्या घरगुती पिण्याच्या पाण्यासाठी धरणातून थेट पाणी उचलल्यास प्रतिहजार लिटरला 25 पैसे आणि कालव्यातून उचलल्यास प्रतिहजार लिटरला 50 पैसे दर होते. ते आता धरणातून पाणी उचलल्यास प्रतिहजार लिटरला 55 पैसे आणि कालव्यातून उचलल्यास प्रतिहजार लिटरला 1.10 रुपये आकारण्यात येणार आहे.

जलसंपदा विभागाने पाण्याचे दर वाढविले आहेत. याचा फटका महापालिकेला बसण्याची शक्यता असून, पाणी खर्च 200 कोटींपर्यंत जाणार आहे.

                          -अनिरुद्ध पावसकर, पाणीपुरवठा विभागप्रमुख, महापालिका.

Back to top button