धरणफुटीने गमावली वाडासंस्कृती; पानशेत दुर्घटनेला आज 61 वर्षे | पुढारी

धरणफुटीने गमावली वाडासंस्कृती; पानशेत दुर्घटनेला आज 61 वर्षे

पुणे : पुढारी वृत्तसेवा: पुण्याला अनेक वर्षांची वाडासंस्कृती होती. परंतु, ही वाडासंस्कृती पानशेत धरणफुटीने गमावली. धरण फुटल्याच्या दुर्घटनेला मंगळवारी (दि. 12 ) 61 वर्षे पूर्ण होत आहेत. या दुर्घटनेमध्ये बेघर झालेल्या पूरग्रस्तांसाठी शासनाने पुणे शहराच्या वेगवेगळ्या भागांत जागा उपलब्ध करून दिल्या. त्यामध्ये सहकारनगर नं. 1, सहकारनगर नं. 2, पद्मावती परिसर, सेनादत्त पेठ, एरंडवणे, दत्तवाडी, पर्वती दर्शन, शिवदर्शन, लक्ष्मीनगर, महर्षीनगर, चतुःश्रृंगी परिसर आणि सेनापती बापट रस्ता या परिसराचा समावेश आहे. 99 वर्षांच्या भाडेपट्टयाने जमिनी देऊन घरे बांधण्यास परवानगी दिली.

काही पूरग्रस्तांना शासनाने घरे बांधून दिली व काही ठिकाणी कर्जे उपलब्ध करून देऊन घरे बांधण्यास परवानगी देत पूरग्रस्तांचे पुनर्वसन केल्याची आठवण पानशेत पूरग्रस्त सहकारी गृहरचना संस्थांचे विकास मंडळाचे अध्यक्ष सुरेश टांकसाळे, सचिव शशिकांत बडदरे आणि सहसचिव गजानन भंडारे यांनी सांगितली. टांकसाळे म्हणाले, की पूरग्रस्त नागरिकांचे पुनर्वसन केले असले, तरी मालकीहक्क मात्र प्रदान करण्यात आली नव्हती. 1991 मध्ये शासनाने ओटेधारक व गाळेधारक पूरग्रस्तांना घरे बांधण्यासाठी भाडेपट्टयाने दिलेल्या जमिनी फेब्रुवारी 1976 च्या किमतीप्रमाणे मालकी हक्काने देण्याचा निर्णय घेतला, परंतु प्लॉटधारक, ल्पिंथधारक पूरग्रस्तांच्या 103 सोसायट्यांना मालकी हक्काने देण्याबाबतचा निर्णय त्या वेळी घेण्यात आला नाही.

जमिनी मालकी हक्काने देण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू केला. बडदरे म्हणाले, की पूरग्रस्तांच्या अनेक अडचणींना तोंड देत त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. पूरग्रस्त संस्थांना मालकी हक्क कसा मिळेल, याबाबत विकास मंडळ सतत प्रयत्नशील आहे. शासनाकडे पाठपुरावा करीत आहे. नवीन शासनानेही सर्व पूरग्रस्तांना मालकी हक्क मिळण्यासाठी सर्व गोष्टींचा विचार करावा, अशी मागणी असून, या कार्यवाहीस गती मिळावी.

‘शाळेत असतानाच आले संकट’
‘मी नऊ वर्षांचा असताना नाना पेठेतील टकार गल्लीतील मनपा शाळेमध्ये तिसरीत होतो. त्याचवेळी नदीला मोठा पूर आला असून, नागझरी नाला उलट्या दिशेते वाहत असल्याने तातडीने शाळा रिकामी करण्यात आली. गणेश पेठेतील माझ्या घरी मी पळतच गेलो असताना घरात पाणी शिरलेले पाहिले आणि आई व भावंडे रस्त्यावर उभे असल्याचे दिसले. या पुरामुळे आम्ही कुटुंबीय नेहरू चौक, शुक्रवार पेठे येथे मुक्कामाला गेलो. पूर ओसरल्यानंतर आम्हाला शिवदर्शन येथे गोलघर वसाहतीत तात्पुरते वास्तव्याची सोय झाली. त्यानंतर आमच्या सहकारी कुटुंबाना लक्ष्मीनगर मधील घरे देण्यात आली,’ अशी आठवण पानशेत धरण पूरग्रस्त दत्तात्रय ढवळे यांनी दै. ‘पुढारी’शी बोलताना सांगितली.

Back to top button