पिंपरी : आता चोवीस तास मिळणार सायबर सेवा | पुढारी

पिंपरी : आता चोवीस तास मिळणार सायबर सेवा

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा: शहर परिसरातील सायबर गुन्ह्यांची वाढ लक्षात घेत नागरिकांना तत्काळ प्रतिसाद मिळावा, यासाठी आता सायबर सेलची 24 तास सेवा उपलब्ध राहणार आहे. याबाबत पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी संबंधित विभागाला सूचना दिल्या आहेत.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, मोबाईल व ऑनलाईन बँकिंगच्या वाढत्या वापरामुळे सायबर क्राईमचा आलेख झपाट्याने वाढू लागला आहे. मागील सहा महिन्यात पिंपरी- चिंचवड सायबर सेलकडे सुमारे साडे तीन हजार तक्रारी आल्या आहेत. यातील अनेक प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

अलीकडे काही वर्षात कॅशलेस व्यवहारात वाढ झाली आहे. कोणतीही खात्री न करता मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड केले जात आहेत. गोपनीय कागदपत्रांची डिजिटल कॉपी वापरात आल्याने सायबर चोरट्यांना आयते कुरण मिळू लागले आहे. याव्यतिरिक्त सोशल मीडियावर देव-देवता, महापुरुषांचे विडंबन, महिलांचे बनावट प्रोफाईल तयार करणे, मॉर्फिंग, अश्लील फोटो वेबसाईट्सवर टाकणे या गुन्ह्यांचा छडा लावणे हे देखील पोलिसांसमोरचे मोठे आव्हान आहे. फेसबुक, ट्विटर, लिंक्ड इन, व्हॉट्सअ‍ॅपसारख्या सोशल मीडियावर देवी-देवता व महापुरुषांसंबंधी बदनामीकारक मजकूर टाकून दोन समाजात तेढ निर्माण करण्याचे देखील प्रकार वाढू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी सायबर सेलचे मनुष्यबळ वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

सायबर गुन्ह्यांची तक्रार करण्यासाठी आलेल्या नागरिकांना तत्काळ प्रतिसाद मिळणे अपेक्षित आहे. त्यासाठी सायबर सेल अंतर्गत नवीन डेस्क सुरू करण्यात येत आहे. यामध्ये 24 तास अधिकारी व कर्मचारी कार्यरत राहून नागरिकांचे समाधान करतील

                                              – अंकुश शिंदे, पोलिस आयुक्त, पिंपरी- चिंचवड.

 

Back to top button