ताथवडेतील पुलाखाली पाणीच पाणी | पुढारी

ताथवडेतील पुलाखाली पाणीच पाणी

ताथवडे : पिंपरी चिंचवड शहरात गेल्या पाच ते सहा दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे ताथवडे अशोकनगर जवळील पुलाखाली पावसाचे पाणी साचले होते. त्यामुळे परिसरात वाहतूककोंडी झाली होती. पाणी साचल्याने वाहनचालकांना वाहने चालवताना कसरत करावी लागली.

ताथवडे पुलाखालील भाग सखल असल्याने तसेच आजूबाजूला तीव्र उतार असल्याने सेवा रस्त्यावरून आलेले सर्व पाणी पुलाखाली साचते. परिणामी वाहनांचा वेग मंदावून वाहतूककोंडी होते. या परिसरात आजूबाजूला अनेक गृहप्रकल्प सुरू आहेत. त्यामुळे जा पुलाखालून अवजड वाहनांची वर्दळ होत असल्यामुळे वाहतूककोंडीत भर पडत आहे.

तसेच, अनेक उच्चभ्रू सोसायट्या, वाहनाचे शोरुम, मोठी आस्थापने, हॉटेल्स, उपहारगृहे या ठिकाणी असल्याने या परिसरात वाहनांची सतत वर्दळ असते. काही बेजबाबदार, बेशिस्त वाहनचालक ओव्हरटेक करण्यासाठी वाहने विरुद्ध दिशेने चालवतात. येथील रहदारीचा मुख्य रस्ताही अरुंद असल्याने वाहतूककोंडी हे नित्याचेच झालेले आहे. त्यामुळे या पुलाखाली वाहतूक नियंत्रित करण्यासाठी वाहतूक पोलिसांची नियुक्ती करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.

Back to top button