जिल्हा सहकारी बँकांची निवडणूक प्रक्रिया, अंतिम मतदार यादी २७ सप्टेंबरला | पुढारी

जिल्हा सहकारी बँकांची निवडणूक प्रक्रिया, अंतिम मतदार यादी २७ सप्टेंबरला

पुणे; पुढारी वृत्तसेवा: राज्यात १५ जिल्हा सहकारी बँकांची निवडणूक प्रक्रिया सध्या सुरु झालेली आहे. जिल्हा सहकारी निवडणूक अधिकार्‍यांकडून बँकांची अंतिम मतदार यादी २७ सप्टेंबर रोजी प्रसिध्द करण्याचा सुधारित कार्यक्रम राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे आयुक्त डॉ. जगदीश पाटील यांनी जाहीर केलेला आहे.

त्यामुळे ऑक्टोंबर महिनाअखेर आणि ऐन दिवाळी सणांच्या फटाक्याच्या आतषबाजीमध्येच जिल्हा बँकांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरु होणार आहे.

राज्य सरकारने राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका ज्या टप्प्यावर असतील त्या टप्प्यावर ३१ ऑगस्ट २०२१ पर्यंत पुढे ढकललेल्या होत्या. तर ९ ऑगस्टच्या आदेशानुसार, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांची निवडणूक प्रक्रिया ज्या टप्प्यावर स्थगित करण्यात आली होती. त्या टप्प्यापासून पुढे तात्काळ सुरु करण्याची कार्यवाही करण्याचे आदेश दिले.

परिणामी, मतदार यादी कार्यक्रम ज्या टप्प्यावर स्थगित करण्यात आलेला होता. त्या टप्प्यापासून पुढे तात्काळ सुरु करणे क्रमप्राप्त झालेले असल्याचे राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे सचिव यशवंत गिरी यांनी सर्व जिल्हा सहकारी निवडणूक अधिकार्‍यांना सुचित केले आहे.

तसेच मतदार यादी अंतिम करण्याचा सुधारित कार्यक्रम जाहीर केलेला आहे. त्यानुसार जिल्हा सहकारी निवडणूक अधिकार्‍यांनी प्राप्त संस्था प्रतिनिधींचे ठराव बँकेस १७ ऑगस्टपर्यंत दयावेत. बँकेने प्रारुप मतदार यादी जिल्हा सहकारी निवडणूक अधिकार्‍यास २५ ऑगस्टपर्यंत सादर करावी.

त्यानुसार प्रारुप मतदार यादी जिल्हा सहकारी निवडणूक अधिकार्‍यांनी ३ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता प्रसिध्द करावयाची आहे. तर जिल्हा सहकारी निवडणूक अधिकार्‍यांकडे प्रारुप मतदार यादीवर आक्षेप सादर करण्याचा अंतिम दिनांक १३ सप्टेंबर आहे. तर जिल्हा सहकारी निवडणूक अधिकार्‍यांनी प्राप्त आक्षेपांवर निर्णय देण्याचा अंतिम दिनांक २२ सप्टेंबर आहे. तर अंतिम मतदार यादी २७ सप्टेंबर रोजी प्रसिध्द करण्याच्या सूचना सचिव गिरी यांनी दिलेल्या आहेत.

जिल्हा बँकांच्या निवडणुकांमध्ये पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, उस्माणाबाद, जळगाव, लातूर, नाशिक, धुळे-नंदुरबार या १२ बँकांची निवडणूक प्रक्रिया तत्काळ सुरु झालेली आहे. तर आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये बुलडाणा, सोलापूर, नागपूर या बँका निवडणुकीस पात्र असल्याने एकूण पंधरा बँकांच्या निवडणुका होतील, असेही प्राधिकरणाकडून स्पष्ट करण्यात आले.

महिनाभराचा कालावधी अपेक्षित…

अंतिम मतदार यादी प्रसिध्द झाल्यानंतर अर्ज भरण्याची प्रक्रियेचा कार्यक्रम ११ ते १९ दिवसांच्या दरम्यान सुरु राहतो. त्यानंतर अर्जांची छाननी, पात्र उमेदवार यादी, त्यावर मुदत आणि पात्र अंतिम उमेदवारांची यादी प्रसिध्दीनंतर निवडणूक कार्यक्रम सुरु होणे अपेक्षित आहे.

म्हणजे, २७ सप्टेंबरला अंतिम यादी प्रसिध्द झाली तरी ऑक्टोंबर महिनाअखेर बहुतांशी पात्र जिल्हा बँकांच्या निवडणुका सुरु होण्याची अपेक्षा आहे. १ नोव्हेंबरपासून दिवाळीस सुरुवात होत आहे. त्यामुळे ऐन दिवाळीत निवडणुकांची रणधुमाळी महत्वपूर्ण ठरणार आहे. असे असले तरी कोरोना साथीची पुढील स्थिती कशी राहणार? यावर बरेच चित्र अवलंबून राहील.

हेही वाचलंत का? 

पाहा : काबूल ग्राऊंड रिपोर्ट : तालिबान दहशत अनुभवलेला काबूलचा वालीजान पुढारी ऑनलाईनवर

Back to top button