जिल्हा परिषदेत वाढणार खुल्या गटांच्या जागा; 14 जागा मागास वर्गींयांसाठी राखीव | पुढारी

जिल्हा परिषदेत वाढणार खुल्या गटांच्या जागा; 14 जागा मागास वर्गींयांसाठी राखीव

पुणे: पुढारी वृत्तसेवा: पुणे जिल्हा परिषदेच्या एकूण गटांपैकी 14 गट हे मागासवर्गीयांसाठी आरक्षित होणार आहेत. गटांची संख्या वाढल्याने आणि यंदाच्या गटांच्या आरक्षण सोडतीतून नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) वगळण्यात आल्याने खुल्या गटांच्या जागांत वाढ होण्याची शक्यता आहे, असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. चौदा गट हे मागासवर्गीयांसाठी आरक्षित असणार आहेत. त्यापैकी अनुसूचित जातीसाठी (एससी) आठ आणि अनुसूचित जमातीसाठी (एसटी) सहा जागा असणार आहेत. अनुसूचित जाती प्रवर्गाच्या आठपैकी चार जागा सर्वसाधारण व चार जागा महिलांसाठी तर, अनुसूचित जमातीच्या जागांपैकी तीन जागा सर्वसाधारण आणि तीन जागा या प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित केल्या जाणार आहेत.

मागासवर्गीयांसाठी कोणते 14 गट राखीव होणार, याचा निर्णय बुधवारी (दि.13) होणार आहे. दरम्यान, खुल्या गटांच्या जागांमध्ये यंदा 13 ने वाढ होणार आहे. जिल्हा परिषदेच्या सदस्यांची संख्या ही 75 एवढी होती. त्यामध्ये सातने वाढ झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण जिल्हा परिषद सदस्यांची संख्या आता 82 होणार आहे. पूर्वीच्या एकूण 75 जागांपैकी नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी (ओबीसी) एकूण 20, अनुसूचित जातीसाठी (एससी) सात आणि अनुसूचित जमातीसाठी (एसटी) पाच अशा एकूण जागा राखीव होत्या. उर्वरित 43 जागा या खुल्या गटांसाठी होत्या. मात्र, यापैकी 22 जागा या खुल्या गटातील महिलांसाठी राखीव होत्या. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या मावळत्या सभागृहातील 75 पैकी 21 जागा या खुल्या गटासाठी होत्या. त्यात आता 13 ने वाढ होऊन ही संख्या 34 वर जाणार आहे.

Back to top button