विद्यार्थ्यांनी मांडले विविध वास्तू प्रकल्प; एक्झिट एक्झिबिशनचे आयोजन | पुढारी

विद्यार्थ्यांनी मांडले विविध वास्तू प्रकल्प; एक्झिट एक्झिबिशनचे आयोजन

पुणे: पुढारी वृत्तसेवा: पुण्यातील मुळा- मुठा नदी काठावरील अत्याधुनिक सांस्कृतिक केंद्र, पूर्वी शुद्ध पाण्याचा प्रवाह असलेला आणि आता नाल्याचे स्वरूप झालेल्या आंबिल ओढ्याच्या बाजूने करता येतील, असे पुण्याचे स्वरूप बदलणारे आणि सर्वोत्तम राहणीमान मिळवून देणारे विविध प्रकल्प विद्यार्थ्यांनी सादर केले. आधुनिक तंत्रज्ञान आणि कल्पकता वापरून तयार केलेले विविध वास्तुकला प्रकल्प एक्झिट 2022 या प्रदर्शनात मांडण्यात आले आहेत. विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी संस्थेमार्फत संचलित पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील कॉलेज (पीव्हीपी) ऑफ आर्किटेक्चरतर्फे एक्झिट एक्झिबिशन 2022 या वास्तूकला प्रदर्शनाचे आयोजन लोकशाहीर अण्णा भाऊ साठे सभागृह येथे करण्यात आले आहे.

प्रदर्शनाचे उद्घाटन पिंपरी चिंचवडचे आयुक्त राजेश पाटील, व्हीके आर्किटेक्चरचे संस्थापक विश्वास कुलकर्णी, व्हीआयटीचे अध्यक्ष अ‍ॅड. अभय छाजेड, उपाध्यक्ष इंदर छाजेड, मार्गदर्शक विकास भंडारी, व्हीआयटीचे सचिव जितेंद्र पितळिया, प्रबंध मार्गदर्शक विजया श्रीनिवासन, आशीष श्रीवास्तव उपस्थित होते. ताजमहाल कारागिरांचे ताजगंज पुनर्विकास प्रकल्प, पुण्यातील डिजिटल मीडिया हब आणि डेटा सेंटर, किशोर सुधार केंद्र, नाशिकमधील द्राक्ष शेतकर्‍यांसाठी अत्याधुनिक संशोधन आणि माहिती केंद्र, आदिवासी भागातील मेडिकल सेंटर, पारंपरिक पद्धतीने बांधलेले सांस्कृतिक कला केंद्र, संत कबिरांची जीवनशैली शिकविणारे शिक्षण केंद्र, दिल्ली, राजस्थान, आसाम, नागालँड अशा देशातील विविध ठिकाणच्या ऐतिहासिक वास्तूंचा अभ्यास करीत अतिशय उत्कृष्टपणे प्रतिकृती विद्यार्थ्यांनी तयार केल्या आहेत. 10 जुलैपर्यंत प्रदर्शन विनामूल्य पाहण्यास खुले आहे.

Back to top button