तलावातील पाणी ओढ्यात | पुढारी

तलावातील पाणी ओढ्यात

पुणे: पावसाळ्यात आंबिल ओढ्याला पूर येऊ नये, यासाठी राजीव गांधी प्राणी संग्रहालयातील तलावाचे पाणी ओढ्यात सोडण्यात येत आहे. शहर व परिसरात मागील पाच दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. अद्याप शहरात जोरदार पावसाने हजेरी लावलेली नाही. त्यापूर्वी महापालिका प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून उपाययोजना सुरू केल्या आहेत. आंबिल ओढ्याला येणार्‍या पुराचा धोका लक्षात घेऊन कात्रज येथील तलावातील पाणी कमी केले जात आहे. याशिवाय पाणी तुंबण्याच्या ठिकाणांची माहिती मिळाल्यानंतर त्या ठिकाणी जाऊन महापालिकेचे कर्मचारी जेटिंग मशिनच्या साह्याने पावसाच्या पाण्याचा प्रवाह सुरळीत करण्याचा प्रयत्न करीत आहेत;

तसेच साठलेल्या पाण्याचा उपसाही केला जात आहे. प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयास एक याप्रमाणे एकूण पंधरा आणि पाच परिमंडळांत प्रत्येकी एक अशी एकूण 20 जेटिंग मशिन उपलब्ध आहेत, असे अतिरीक्त आयुक्त कुणाल खेमनार यांनी स्पष्ट केले. ‘मेट्रोच्या कामामुळे ज्या भागात पावसाचे पाणी साठत आहे, अशा ठिकाणी योग्य ती उपाययोजना करावी, असे मेट्रो प्रशासनाला कळविले आहे. शहरातील विविध नाल्यांवर असलेल्या 21 पैकी अठरा कल्व्हर्टचे काम पूर्ण होत आले आहे. साधारणपणे ही कामे ऑगस्ट महिन्यापर्यंत पूर्ण होतील, तर तीन ठिकाणी जागेचा प्रश्न निर्माण झाल्याने काम सुरू होऊ शकलेले नाही,’ असेही खेमनार यांनी नमूद केले.

Back to top button