बंडखोरांमुळे विकासकामे रखडली : खा. सुळे | पुढारी

बंडखोरांमुळे विकासकामे रखडली : खा. सुळे

नसरापूर : पुढारी वृत्तसेवा: दुसर्‍या पक्षात घरोबा करण्यापूर्वी आपल्या मतदारसंघातील तमाम जनतेला त्या लोकप्रतिनिधींनी सांगण्याचे उत्तरदायित्व होते. मात्र, तसे न करता ते गोवा, सुरत, गुवाहाटीला जाऊन लपून बसले. टेबलावर नाचून सर्व ओके आहे, असे फक्त टीव्हीवर सांगायचे हे शोभत नाही. विकले गेलेल्या बंडखोर आमदारांमुळे राज्यात गेल्या एक महिन्यापासून जनतेची विकासकामे रखडली असल्याचा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केला.

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नूतनीकरण करण्यात आलेल्या शिवरे (ता. भोर) येथील शाखेचे शुक्रवारी (दि. 8) उद्घाटन करण्यात आले. यावेळी खा. सुळे बोलत होत्या. यावेळी आमदार संग्राम थोपटे, बँकेचे अध्यक्ष प्रा. दिगंबर दुर्गाडे, उपाध्यक्ष सुनील चांदेरे, संचालक विकास दांगट, पूजा बुट्टे – पाटील, निर्मला जागडे, प्रवीण शिंदे, भालचंद्र जगताप, विक्रम खुटवड, बँकेचे सरव्यवस्थापक विजय टापरे, विकास अधिकारी सुदाम पवार, शाखा व्यवस्थापक सागर गाडे आदी उपस्थित होते.

यावेळी खा. सुळे म्हणाल्या, नाती जपून व्यवहार शिकवणारी व माणुसकी जपणारी एकमेव पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक म्हणून ओळखली जाते. जिल्हा बँक सर्वसामान्य ग्राहकांची मायबाप म्हणून ओळखली जाते हे अभिमानास्पद आहे.
आमदार संग्राम थोपटे म्हणाले, शेतकर्‍यांना महाविकास आघाडीने प्रोत्साहनपर 50 हजार अनुदान जाहीर केले होते. सरकार बदलले असले तरी शेतकर्‍यांच्या हितासाठी अधिक ताकदीने अधिवेशनात पाठपुरावा करणार आहे. बँकेचे अध्यक्ष प्रा. दिगंबर दुर्गाडे म्हणाले, बँकेची 20 हजार कोटी वार्षिक उलाढाल, 8 हजार कोटींचे कर्ज वाटप, तर 360 कोटी नफा झाला आहे.

Back to top button