स्टार्टअप नवसंशोधकांसाठी विद्यापीठाचा ‘पॉवर 2022’ | पुढारी

स्टार्टअप नवसंशोधकांसाठी विद्यापीठाचा ‘पॉवर 2022’

पुणे : पुढारी वृत्तसेवा: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नवोपक्रम, नवसंशोधन आणि साहचर्य विभागाच्या वतीने नवसंशोधकांसाठी ‘पॉवर 2022’ हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना स्टार्टअप सुरू करण्यासाठी आवश्यक मार्गदर्शनासोबतच 5 लाख रुपयांपर्यंतचा सीड फंड म्हणजेच बीज भांडवल मिळण्याची संधी याद्वारे उपलब्ध होणार आहे. पॉवर 2022 हा ‘प्री इंक्यूबेशन’ कार्यक्रम असून, याअंतर्गत नव्या कल्पना, स्वतःचे स्टार्टअप सुरू करण्यासाठी नवसंशोधक तयार करणे, व्यावसायिकदृष्ट्या सक्षम करणे, व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक कायदेशीर माहिती देण्यात येणार आहे.

या संदर्भात ‘इनोव्हेशन सेल’च्या संचालिका डॉ. अपूर्वा पालकर म्हणाल्या, ‘जे स्टार्टअप प्राथमिक अवस्थेत आहेत, त्यांना अनेकदा मार्गदर्शनाची गरज असते. तसेच चांगल्या स्टार्टअपला पुढे जाण्यासाठी निधीचीही गरज असते. या ‘पॉवर 2022’च्या माध्यमातून आम्ही या दोन्ही गोष्टी देत आहोत. व्यवसाय सुरू करण्याबाबत मार्गदर्शन करण्यासोबतच व्यवसाय सुरू करण्याची प्राथमिक माहिती, कायदेशीर बाबी या कार्यक्रमात शिकायला मिळतील. यात प्रवेश घेण्यासाठी अर्जप्रक्रिया सुरू झाली असून ‘आय टू ई’ स्पर्धेतील स्पर्धकांनाही यामध्ये सहभागी होता येईल. ‘आय टू ई’मधील स्पर्धकांसाठी याचे शुल्क 5 हजार असेल, तर नव्याने नोंदणी करणार्‍यांसाठी या कोर्सचे शुल्क 10 हजार असेल. मागील वर्षी 60 स्पर्धक सहभागी झाले होते. त्यातील 24 जणांनी स्वतःची कंपनी सुरू केली आहे, तर दहा जणांच्या कंपन्या ‘एसपीपीयू रिसर्च पार्क फाउंडेशन’च्या माध्यमातून उभ्या राहत आहेत. पाच स्पर्धक गुंतवणुकीसाठी सज्ज आहेत.’

अर्ज करण्यासाठी लिंक
या योजनेचा फायदा घेण्यासाठी अर्ज करावा लागणार आहे. यासाठी http://seedfund.startupindia.gov.in ही लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे.

‘पॉवर 2022’ हा कार्यक्रम स्टार्टअपना प्रोत्साहित करण्यासाठी आयोजित केला आहे. त्यासोबत ‘महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटी’कडून विद्यापीठाला जो निधी प्राप्त झाला आहे त्यातील पहिल्या पाच निवडक स्टार्टअपना या माध्यमातून 1 ते 5 लाख रुपयांचा निधी देण्यात येणार आहे.

डॉ. अपूर्वा पालकर, संचालिका, नवोपक्रम,
नवसंशोधन आणि साहचर्य केंद्र, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

Back to top button