दहशत निर्माण करणार्‍या तरुणास पकडले | पुढारी

दहशत निर्माण करणार्‍या तरुणास पकडले

पुणे : पुढारी वृत्तसेवा: लोखंडी कोयता हातात घेऊन येणार्‍या-जाणार्‍या लोकांना धमकावून परिसरात दहशत निर्माण करणार्‍या तरुणाला गस्तीवरील पोलिसांनी पकडले. त्याने पोलिस कर्मचार्‍याला ढकलून दुखापतही केली. तसेच सरकारी कामात अडथळा निर्माण केला. या प्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी संघर्ष ऊर्फ भाव्या नितीन अडसूळ (वय 19, रा. ताडीवाला रोड) याला अटक केली आहे. याबाबत पोलिस कर्मचारी अमित बधे यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना गुरुवारी दुपारी येथील बाजार रोड परिसरात घडली.

बधे हे त्यांचे सहकारी विशाल जाधव यांच्यासोबत ताडीवाला चौकीच्या हद्दीत गस्तीवर होते. त्यावेळी भाव्या दुचाकीवर बसून हवेत कोयता उगारून येणार्‍या-जाणार्‍या लोकांना दम देत मोठ्याने आरडा-ओरडा करत होता. दरम्यान, हा प्रकार निदर्शनास येताच बधे यांनी त्याला पकडले. त्यावेळी त्याने बधे यांना धक्काबुक्की करून ढकलून दिले. ते करत असलेल्या सरकारी कर्तव्यापासून त्यांना रोखल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक अभिजित जाधव करीत आहेत.

Back to top button