पुरवणी परीक्षेसाठी प्रवेशपत्र आजपासून; आतापर्यंत 52 हजार विद्यार्थ्यांची नोंदणी | पुढारी

पुरवणी परीक्षेसाठी प्रवेशपत्र आजपासून; आतापर्यंत 52 हजार विद्यार्थ्यांची नोंदणी

पुणे : पुढारी वृत्तसेवा: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणार्‍या बारावीच्या परीक्षेच्या विद्यार्थ्यांची पुरवणी परीक्षा 21 जुलै ते 12 ऑगस्ट या कालावधीत होणार आहे. या परीक्षेसाठी 52 हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, प्रवेशपत्र शनिवारपासून (दि. 9) ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात येणार आहे, अशी माहिती राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी दिली. बारावीच्या मार्च-एप्रिलमध्ये झालेल्या परीक्षेतील अनुत्तीर्ण, श्रेणी सुधारू इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांसाठी पुरवणी परीक्षा घेतली जाते. त्यानुसार व्यवसाय अभ्यासक्रमाची परीक्षा 21 पासून सुरू होईल.

प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा 20 जुलै ते 8 ऑगस्ट या कालावधीत होईल. शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांनी https://www.mahahsscboard.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिलेल्या प्रवेशपत्राची प्रत काढून त्यावर मुख्याध्यापकांनी शिक्का आणि स्वाक्षरी करून विद्यार्थ्यांना द्यावी. त्यासाठी शुल्क घेऊ नये. माध्यम आणि विषय याबाबत बदल असल्यास शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळातून दुरुस्त करून घ्यावे, प्रवेशपत्रातील छायाचित्र, नाव, स्वाक्षरी याबाबत दुरुस्ती शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी त्यांच्या स्तरावर करून त्याची एक प्रत विभागीय मंडळाला पाठवावी, प्रवेशपत्र गहाळ झाल्यास दुसरी प्रत देऊन त्यावर द्वितीय प्रत असा शेरा द्यावा, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

Back to top button