विद्यार्थ्यांना हवेय थेट नोकरी देणारे शिक्षण | पुढारी

विद्यार्थ्यांना हवेय थेट नोकरी देणारे शिक्षण

गणेश खळदकर

पुणे : बारावीनंतरच्या पदवी शिक्षणासाठी विद्यार्थी पारंपरिक शिक्षणाकडे कानाडोळा करत थेट नोकरी देणार्‍या अभ्यासक्रमांकडे वळत आहेत. त्यामुळे महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी नवीन रोजगाराभिमुख अभ्यासक्रमांच्या शोधात असल्याचे दिसून येत आहे. बीबीए, बीएस्सी अ‍ॅनिमेशन, बीसीए सायन्स, हॉटेल मॅनेजमेंट, वाइन टेक्नॉलॉजी अशा अभ्यासक्रमांना प्राधान्य आहे, तर स्टोरी बोर्ड, जाहिरात, सिनेमा, गेम, कॅरेक्टर डिझाइनिंग, मूव्हमेंट, मोल्डिंग आदी क्षेत्रांमधील करिअरसाठी बी.एस्सी. अ‍ॅनिमेशन कोर्सला प्राधान्य आहे. चित्रपट, जाहिरात, पत्रकारिता, जनसंपर्क, अशा क्षेत्रांत करिअर करण्याची इच्छा असणार्‍या विद्यार्थ्यांचे मास कम्युनिकेशन कोर्सला प्राधान्य आहे.

विज्ञान शाखेतील अभियांत्रिकी, वैद्यकीय, फार्मसी, डेंटल, फिजिओथेरपी या अभ्यासक्रमांकडे कल आहे. वाणिज्य शाखेतील सी.ए.,आयसीडब्ल्यूए, सी.एस., फायनान्स, कन्सल्टंट, विमा, विपणन, डिजिटल मार्केटिंग, विविध कंपन्यांची आर्थिक व्यवहारासंदर्भातील कामे मिळण्यासाठी आवश्यक अभ्यासक्रमाकडे कल आहे. विज्ञान शाखेच्या आयओटी अर्थात इंटरनेट ऑफ थिंग्स, पायथॉन प्रोग्रॅमिंग, मॅथलॅब, पायथॉन प्रोग्रॅमिंग, इलेक्ट्रॉनिक्स, भौतिकशास्त्र, खगोलशास्त्र, रोबोटिक्स, उपकरणशास्त्र, जैवतंत्रज्ञान, जैवमाहितीशास्त्र, सूक्ष्मजीवशास्र, वैद्यकीय जीवशास्त्र आदी अभ्यासक्रमांकडे कल आहे. बीए एलएलबी, बीबीए एलएलबी किंवा पाच वर्षांचा एमएस्सी इंटिग्रेटेड प्रोग्रॅम हे पर्यायदेखील उपलब्ध आहेत.

विद्यार्थी पारंपरिक शिक्षणापेक्षा रोजगाराभिमुख शिक्षणाला प्राधान्य देत आहेत. याचे उदाहरण म्हणजे विज्ञान शाखेअंतर्गत असलेल्या बॅचलर ऑफ कॉम्प्युटर अ‍ॅप्लिकेशन या अभ्यासक्रमाच्या 80 जागांसाठी 1 हजार 700 अर्ज आले आहेत. बीएस्सी कॉम्प्युटर, फॅशन टेक्नॉलॉजी आदी अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांची पसंती आहे.

                                              – डॉ. राजेंद्र झुंजारराव, प्राचार्य, मॉडर्न महाविद्यालय

हॉटेल मॅनेजमेंट, रिटेल मॅनेजमेंटमध्ये बीए, हॉटेल मॅनेजमेंटमध्ये बीएस्सी, फॅशन मर्चेंडायझिंग अँड मार्केटिंगमधील बीए, ट्रॅव्हल अँड टुरिझम मॅनेजमेंटमध्ये बीए, बॅचलर ऑफ बिझनेस इकॉनॉमिक्स, बॅचलर ऑफ इंटरनॅशनल बिझनेस अँड फायनान्स, मॅनेजमेंट स्टडीज, बॅचलर ऑफ बिझनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन, बँकिंग आणि इन्शुरन्स, चार्टर्ड अकाउंटंन्सी, कंपनी सेक्रेटरी असे नवनवीन रोजगाराभिमुख अभ्यासक्रम आले आहेत, याकडे विद्यार्थ्यांचा ओढा आहे.

                                        – प्रा. डॉ. ऋ षिकेश काकांडीकर, झील इन्स्टिट्यूट, पुणे

सध्या वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांना मागणी आहे. त्यामुळे नोकरी मिळवण्याच्या दृष्टीने विद्यार्थी वाणिज्य शाखेमधील नावीन्यपूर्ण अभ्यासक्रमांवर भर देत आहेत. कोरोनामुळे पॅरामेडिकल अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांचा ओढा आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया होणे बाकी असून, विद्यार्थी पालक त्याची वाट पाहात आहेत.

– डॉ. हरीष कुलकर्णी, प्राचार्य, जेएसपीएम वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, हडपसर

Back to top button