राजगुरुनगर बसस्थानकात पाण्याची डबकी | पुढारी

राजगुरुनगर बसस्थानकात पाण्याची डबकी

राजगुरुनगर : पुढारी वृत्तसेवा: अवघ्या दोन दिवसांच्या पावसाने राजगुरुनगर बसस्थानक आवारात पाण्याची डबकी साठली असून, यामुळे स्थानकात अस्वच्छता वाढली आहे. परिसरातील व्यावसायिक, रहिवासी आणि तालुका व प्रवासात असलेल्या सर्वच नागरिकांचा स्थानकात वावर असल्याने आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त आहे. राजगुरुनगर बसस्थानकात उत्तर बाजूला एसटी बस थांब्याच्या ठिकाणी मोठमोठ्या आकाराचे व खोल खड्डे पडले आहेत. पावसाचे पाणी येथे साठून राहते. याशिवाय आवारात जमा झालेल्या पाण्याचा निचरा होणारी व्यवस्था केलेली नाही. पावसाचे पाणी अडून राहते.

त्यातूनच बस ये-जा करतात व थांबतातसुध्दा. एसटी बसमध्ये बसायला आणि उतरायला प्रवाशांना डबक्याच्या पाण्यातून वावरावे लागते.
खेड तालुक्याच्या ग्रामीण भागातील विद्यार्थी, विद्यार्थिनी, महिला, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक यामुळे हैराण झाले आहेत. काही बस किंवा खासगी वाहने वाढीव वेगाने येथून जातात. त्या वेळी बसची प्रतीक्षा करणार्‍या प्रवाशांच्या अंगावर डबक्यातील पाणी उडण्याचे प्रकार घडतात. राजगुरूनगर आगारप्रमुखांनी परिसरातील खड्डे तातडीने बुजविण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी होत आहे.

सुलभ शौचालयाच्या टाकीचा स्लॅब तुटला
बसस्थानक आवारात सुलभ शौचालय आहे. या शौचालय टाकीचा स्लॅब तुटला व खचला आहे. टाकीतून मोठ्या प्रमाणात दुर्गंधी बाहेर पडत आहे. राक्षेवाडी परिसरातील पायी जाणारे नागरिक नाका-तोंडाला रुमाल लावून ये-जा करतात. शिवाय येथे अपघाताने एखादा व्यक्ती, दुचाकी, चारचाकी गेली तर जीवघेणा प्रकार घडू शकतो.

Back to top button