बारामती तालुक्यात पावसाचे प्रमाण कमीच | पुढारी

बारामती तालुक्यात पावसाचे प्रमाण कमीच

बारामती : पुढारी वृत्तसेवा: बारामती तालुक्यात अद्यापही सरासरीपेक्षा कमीच पाऊस झाल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. जुलै महिन्यातील जवळपास दहा दिवसांचा कालावधी होऊनही बारामती तालुक्यातील बहुतांश भाग तहानलेला आहे. समाधानकारक पाऊस झाला नसल्याने जिरायती भागातील शेती अडचणीत आली आहे. याशिवाय बारामतीला पाणीपुरवठा करणार्‍या वीर धरणातही अत्यल्प पाणीसाठा शिल्लक असल्याने शेती अडचणीत आली आहे.

चार दिवसांपूर्वी बारामती शहर आणि बागायती पट्ट्यात पाऊस झाला. मात्र, हा पाऊस कमी-अधिक प्रमाणात झाला, तर जिरायती भागाला पावसाने हुलकावणी दिली. तालुक्यात चार दिवसांपासून ढगाळ वातावरण असूनही पाऊस पडत नसल्याने पेरणीची कामे रखडली आहेत. उपलब्ध पाण्यावर शेतकर्‍यांनी बाजरी आणि सोयाबीन पेरणी केली आहे. मात्र, त्याचे प्रमाण कमी आहे. पावसावर अवलंबून असलेल्या खरिपातील पेरण्या मात्र लांबणार आहेत. पाऊस लांबूनही उपलब्ध पाण्यावर अनेक शेतकर्‍यांनी खरिपातील पिके घेतली आहेत.

मात्र, परतीच्या पावसामुळे ही पिके वाया जाण्याची भीती शेतकर्‍यांना आहे. त्यामुळे वेळेत पाऊस झाला, तर पिके तरतील आणि त्यातून अपेक्षित उत्पादन मिळेल, अशी आशा शेतकर्‍यांना आहे. पाऊस झाला नसल्याने तालुक्यातील बहुतांश ओढे, नाले, तलाव कोरडे पडले आहेत. जनावरांचा चारा, वन्यप्राण्यांच्या चार्‍याचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही कायम आहे. एक-दोन मुसळधार पाऊस झाल्यानंतर या सर्व संकटातून शेतकरी बाहेर येणार आहे.

Back to top button