नाझरे धरणात अत्यल्प पाणीसाठा; 31 जुलैअखेर पिण्यासाठी पाणी | पुढारी

नाझरे धरणात अत्यल्प पाणीसाठा; 31 जुलैअखेर पिण्यासाठी पाणी

जेजुरी : पुढारी वृत्तसेवा: नाझरे (मल्हार सागर) धरणात गेल्या वर्षी झालेल्या अपुर्‍या पावसामुळे आजअखेर मृत साठ्याच्या खाली 113 दशलक्ष घनफूट पाणीसाठा उरला आहे. धरणातील पाणी केवळ 31 जुलैअखेर पिण्यासाठी उपलब्ध होणार आहे. त्यानंतर पाणीटंचाईचे भीषण संकट जेजुरी शहर व परिसरातील गावांवर निर्माण होण्याची शक्यता आहे. पाणीटंचाई काळात जेजुरी शहराला मांडकी योजनेतील पाणी उपलब्ध करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असल्याचे जेजुरी पालिकेचे मुख्याधिकारी चारुदत्त इंगुले यांनी सांगितले.
अपुर्‍या पावसामुळे नाझरे धरणात अत्यल्प पाणीसाठा झाला.

पाण्याचे नियोजन करून जेजुरी नगरपालिकेच्या वतीने एक दिवसाऐवजी दोन दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. 788 दशलक्ष घनफूट पाणीसाठा क्षमता असलेल्या नाझरे जलाशयावर तीन प्रादेशिक पाणीपुरवठा योजना आहेत. या योजनांतर्गत जवळपास 56 गावे व वाडीवस्त्यांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. सध्या या जलाशयात केवळ मृतसाठ्याच्या खाली केवळ 113 दशलक्ष घनफूट पाणीसाठा उरला आहे. तसेच गाळाचे प्रमाणही मोठे आहे. पाणीसाठा कमी झाल्याने शेतीसाठीचे आवर्तन यापूर्वीच बंद केले आहे. केवळ पिण्यासाठी पाणीसाठा राखीव ठेवण्यात आला आहे, तो देखील संपत आला आहे.

दि. 31 जुलैअखेर धरणातून पिण्याचे पाणी उपलब्ध होणार असल्याचे शाखा अभियंता अनिल घोडके यांनी सांगितले. जेजुरी पालिकेच्या वतीने नाझरे धरण व मांडकी डोहातून शहराला पिण्याचे पाणीपुरवठा केला जातो. मांडकी डोहातून उपसा करण्यात येणारी पाणी योजना खर्चिक असल्याने यावर्षी या मांडकी डोहातून पाणी घेतले गेले नाही. मात्र, पाणी टंचाईचे संकट गडद होत असल्याने वीर धरणातून जेजुरी एमआयडीसीसाठी असलेल्या पाणी योजनेतून टंचाई काळात पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी शासनाकडे प्रस्ताव दिल्याचे मुख्याधिकारी चारुदत्त इंगुले यांनी सांगितले.

Back to top button