वाहतूक पोलिसांना लाथाबुक्क्यांनी मारहाण; तरुणाला अटक | पुढारी

वाहतूक पोलिसांना लाथाबुक्क्यांनी मारहाण; तरुणाला अटक

पुणे; पुढारी वृत्तसेवा: वाहतूक पोलिसाला शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याप्रकरणी एकाला कोंढवा पोलिसांनी अटक केली आहे. लिएंडर पेट्रीक लोबो (रा. बंडगार्डन रोड) असे त्याचे नाव आहे. या प्रकरणी नानासाहेब गणपतराव मोरे (वय 50, कोंढवा वाहतूक विभाग) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार लोबो याच्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना दोन दिवसांपूर्वी एनआयबीएम चौक, कोंढवा येथे घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मोरे हे कोंढवा वाहतूक विभागात कार्यरत आहेत. दोन दिवसांपूर्वी ते रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास एनआयबीएम चौक कोंढवा येथे वाहतूक नियमन करत होते. त्यावेळी आरोपी लोबो हा त्याच्या चारचाकीतून आला होता. रस्त्याच्या मधोमध गाडी थांबवून त्याने वाहतुकीस अडथळा निर्माण केला होता. मोरे यांनी त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी लोबो याने मोरे आणि त्यांचे सहकारी संजय जाधव यांना शिवीगाळ व दमदाटी करून हाताने-लाथाबुक्क्याने मारहाण केली. तसेच ते करत असलेल्या सरकारी कामात अडथळा निर्माण केला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सोनवणे करीत आहेत.

नो-एन्ट्रीतून येऊनही पोलिसाशी हुज्जत
नो-एन्ट्रीतून आलेल्या दुचाकीस्वाराने वाहतूक पोलिसासोबत हुज्जत घालून अपशब्द वापरून धक्काबुक्की केली. ही घटना दोन दिवसांपूर्वी सायंकाळी गोळीबार मैदान सिग्नल, वानवडी येथे घडली. या प्रकरणी वानवडी पोलिसांनी शफाक अशफाक शेख (वय 26, रा. कोंढवा) याला अटक केली आहे. याबाबत पोलिस कर्मचारी अमर साळवे यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.

Back to top button