पुणे: ‘अग्रसेन रस्ता पंधरा दिवसांत सुरू करणार’ | पुढारी

पुणे: ‘अग्रसेन रस्ता पंधरा दिवसांत सुरू करणार’

येरवडा: विकास आराखड्यातील संगमवाडी ते टिंगरेनगर या रस्त्याचे काम गेल्या अनेक वर्षांपासून अर्धवट राहिले होते. अग्रसेन शाळेने जागा दिल्याने व त्यापुढे काहीअंशी जागा ताब्यात असल्याने या रस्त्याचे काम सुरू होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी पाहणी करून उर्वरित रस्ता कामाचा आज शुभारंभ केला. येत्या पंधरा दिवसांत रस्ता तयार करून रहदारीसाठी खुला केला जाईल, असे त्यांनी सांगितले.

अग्रसेन शाळेने जागा ताब्यात देणेकरिता रस्त्यात येणार्‍या वर्गखोल्या काढून सुरक्षा भिंत बांधून घेतली आहे. पाहणीच्या वेळी विक्रमकुमार, माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, पथविभागाचे प्रमुख व्ही. जी. कुलकर्णी, उपअभियंता अमर मतिकुंद, शाखा अभियंता रवी पाडाळे, भूमी जिंदगीचे राजेंद्र मुठे, अग्रसेन शाळेचे विश्वस्त विकास गुप्ता, भाजप प्रवक्ते मंगेश गोळे, सुभाष चव्हाण उपस्थित होते.
विक्रमकुमार म्हणाले, “या रस्त्याकरिता निधी कमी पडणार नाही. रस्ता वाहतुकीस खुला झाल्यानंतर आळंदी रस्ता, तसेच गोल्फ क्लब चौकातील उड्डाणपुलाच्या कामामुळे होणारी वाहतूक कोंडी कमी होईल.

Back to top button