पुणे : घाटघरचा फडके बंधारा तुडुंब | पुढारी

पुणे : घाटघरचा फडके बंधारा तुडुंब

जुन्नर : पुढारी वृत्तसेवा : आदिवासी पश्चिम भागातील घाटघर व परिसरात पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सुमारे 100 वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी एक बंधारा उभारला होता. त्याचे काम फडके कंपनीने केल्यामुळे त्याला फडके बंधारा म्हणून संबोधले जाते. नुकतेच या बंधार्‍याचे अपूर्ण राहिलेले काम पूर्ण करण्यात आले असून त्यामुळे येथे मोठा पाणीसाठा जमा झाला आहे.

या बंधाऱ्यातील गाळ काढणे, बंधार्‍याची डागडुजी तसेच येथील भिंतीची उंची वाढविण्यात आली होती. सुमारे 1.25 कोटींच्या या कामांमुळे या छोट्या धरणाच्या साठवण क्षमतेत मोठी वाढ झाली असून येत्या काळात येथील पाणीप्रश्न पूर्णपणे सुटणार आहे.

दरम्यान, हा बंधारा उभारताना परिसरातील शेतकर्‍यांची जमीन अधिग्रहित करण्यात आली होती. त्यांच्या उतार्‍यावर तशी नोंद असून त्यांना भरपाई मिळाली होती. मात्र येथील अनिल प्रकाश रावते व भीमराव धोंडिबा खरात यांनी त्यांच्या भातशेतीत पाणी भरल्याची तक्रार केली आहे. यानुसार सर्व्हे नं. 284, 285, 288, 289 या क्षेत्रातील सुमारे 7 एकर क्षेत्र पाण्यात गेल्याचे त्यांनी महसूल विभागाच्या अधिकार्‍यांना सांगितले. या शेतकर्‍यांनी जलसंधारण विभागाकडे तक्रार केली. याबाबतची नुकसानभरपाई व जमिनीचा मोबदला मिळावा, अशी मागणी केली आहे.

Back to top button