पुणे : आदिवासी बांधवांना मिळाला हक्काचा रस्ता | पुढारी

पुणे : आदिवासी बांधवांना मिळाला हक्काचा रस्ता

वाफगाव : पुढारी वृत्तसेवा : गोसासी (ता. खेड) येथील डोंगर पठारावर राहणार्‍या आदिवासी बांधवांना येण्या-जाण्यासाठी नवीन रस्ता करण्यात आला. त्यामुळे त्यांची अनेक वर्षांपासूनची रस्त्याची प्रतीक्षा संपली आहे. हक्काचा रस्ता मिळाल्याने आदिवासी बांधवांच्या चेहर्‍यावर आनंद दिसत होता.

गोसासी (ता. खेड) येथे जांभूळदरा, वडाचीवाडी व देवाचीवाडी या अदिवासी ठाकर समाजाच्या वस्त्या आहेत. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आदिवासी बांधव राहतात. गोसासी पाझर तलावाजवळील डोंगरमाथ्यावर देवाचीवाडी ही आदिवासी समाजाची वस्ती आहे. येथील नागरिकांना ये-जा करण्यासाठी रस्ता नसल्याने त्यांचे खूप हाल होत असत.

डोंगरपठारावर वस्ती असल्याने तेथील महिला, ज्येष्ठ नागरिक व शाळकरी मुलांना दररोज डोंगर चढ-उतार करावा लागत होता. गावापासून लांब लोकवस्ती असल्याने रात्री-अपरात्री पाऊलवाटेने यांना पायपीट करावी लागत होती. रस्ता नसल्याने पावसाळ्यात त्यांना अडचणींचा सामना करावा लागत होता. ठाकरवाडीला रस्ता व्हावा, अशी अनेक वर्षांपासूनची आदिवासी समाजाची मागणी होती.

गोसासीचे सरपंच संतोष गोरडे व आदिवासी बांधवांनी रस्त्यासाठी पाठपुरावा केला. जिल्हा परिषद व पंचायत समिती यांच्या माध्यमातून सद्य:स्थितीत रस्त्याचे काम प्रगतिपथावर आहे. पंचायत समिती बांधकाम विभागाचे शाखा अभियंता बाप्पूसाहेब शिंदे यांनी रस्त्याची व गोसासीत होणार्‍या इतर विकासकामांची पाहणी करून सूचना दिल्या. या वेळी सरपंच संतोष गोरडे, उपसरपंच धोंडीभाऊ शिंदे व आदिवासी बांधव उपस्थित होते.

Back to top button