पुणे : शासकीय जागेत घरे बांधणार्‍यांवर गुन्हे दाखल | पुढारी

पुणे : शासकीय जागेत घरे बांधणार्‍यांवर गुन्हे दाखल

नसरापूर : पुढारी वृत्तसेवा : भोर तालुक्यातील न्हावी 322 या गावच्या हद्दीत राज्य शासनाच्या नावे असलेल्या जागेत अतिक्रमण करून अनधिकृतपणे घरे बांधली गेली आहेत. याबाबत तक्रारी पुढे आल्यानंतर जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाने भोर महसूल विभागाने पंचनामा करून अतिक्रमण करणार्‍या तीन जणांवर गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल असलेल्यांना अद्याप अटक करण्यात आली नाही.

लालासो मारुती खोमणे, ज्ञानेश्वर सोनबा जाधव आणि अजय रूपचंद कांबळे (रा. न्हावी 322, ता. भोर) अशी गुन्हा दाखल केलेल्या अतिक्रमणधारकांची नावे आहेत. दरम्यानच्या काळात अतिक्रमण करणार्‍या या तिघांना महसूल विभागाच्या वतीने नोटिसा देऊन अतिक्रमण काढण्यास सांगितले होते. मात्र, त्यांनी या नोटिशीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने भोर तहसीलदार सचिन पाटील यांच्या निर्देशानुसार किकवीच्या मंडलाधिकारी मनीषा भुतकर यांनी राजगड पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. याबाबतचा तपास राजगड पोलिस करीत आहेत.

अधिक माहिती अशी की, न्हावी 322 येथील गावच्या हद्दीत महाराष्ट्र शासनाच्या नावे असलेली सिटी सर्व्हे नंबर 459 जागेवर अतिक्रमणाबाबत जिल्हाधिकार्‍यांकडे प्रहार जनशक्ती पक्षाचे भोर तालुकाध्यक्ष संतोष मोहिते यांनी तक्रार केली होती. त्यानुसार अतिक्रमणधारकांवर गुन्हा दाखल करण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांनी आदेश दिले होते. त्यानुसार अतिक्रमण काढून घेण्यासाठी भोर तहसील कार्यालयाने दि. 22 जून रोजी नोटीस बजावली होती. मात्र, अतिक्रमण काढले गेले नसल्याने अखेर मंगळवारी (दि. 5) या जागेवरील अतिक्रमणाबाबत भोर महसूल विभागाने भूमिअभिलेख जागेची मोजणी करून सविस्तर पंचनामा करून गुन्हा दाखल केला.

Back to top button