पावसामुळे हिंजवडीत वाहतूककोंडी

हिंजवडी,पुढारी वृत्तसेवा: हिंजवडी परिसरात गेल्या दोन दिवसांपासून पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहे. त्यातच वाहतूक विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे बुधवारी (दि. 6) सकाळी आयटी नगरी हिंजवडी आणि भूमकर वस्ती येथे मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाली होती. गेले महिनाभर दडी मारलेल्या पावसाने गेल्या दोन दिवसांपासून हिंजवडी परिसरात सरी कोसळत आहेत. पावसामुळे वाहतुकीचा वेग मंदावल्याने परिसरात वाहतुककोंडी झाली होती. त्यामुळे आयटीयन्स, नोकरदार वर्ग यांचा मोठा खोळंबा झाला.
बुधवारी पहाटेपासूनच पावसाच्या मोठ्या सरी कोसळत होत्या. अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचले होते. त्यामुळे वाहतूककोंडी होणार हे अपेक्षित असताना वाहतूक विभागाचा कोणताही बंदोबस्त आयटी परिसरात दिसून आला नाही. याउलट मोठ्या कालावधी नंतर येथे वाहतून कर्मचारी उपस्थित झाले. परिणामी तब्बल दीड ते दोन तासांनंतर वाहतूक कोंडी सुटली आणि प्रवाशांनी आणि वाहनचालकांनी सुटकेचा श्वास घेतला. येथील लक्ष्मी चौक-भूमकर वस्ती रस्ता भूमकर चौक, शिवाजी चौक, सुरतवाल कॉम्प्लेक्स येथे मोठ्या प्रमाणात वाहतुकीची समस्या निर्माण होत आहे.