दात पडलेले पाहून पोलिसच हसले! न्याय कसा मागायचा? | पुढारी

दात पडलेले पाहून पोलिसच हसले! न्याय कसा मागायचा?

पुणे : पुढारी वृत्तसेवा: सुनेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करीत तिचे दगडाने दात पाडणार्‍या सासर्‍यावर लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गंभीर जखमी केल्याप्रकरणी व विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. परंतु, सासर्‍याला अटक करण्याच्या मागणीसाठी पोलिसांकडे गेलेल्या तरुणीला पाहून पोलिस हसल्याने याबाबत तिने भाजपनेत्या चित्रा वाघ यांच्यापुढे गार्‍हाणे मांडले. पोलिस ठाण्यात योग्य वागणूक न दिल्याने वाघ यांनी पोलिस ठाण्याच्या अधिकार्‍यांवर तीव्र नाराजी व्यक्त केली. दाखल गुन्ह्यानुसार पीडित तरुणी लोणी स्टेशन येथे राहण्यास आहे. पतीबरोबर तिचा सुखाने संसार सुरू होता. त्यांना एक तीन वर्षांचा मुलगादेखील आहे. तिचे पती हमाली काम करतात.

2017 मध्ये दोघांनी प्रेमविवाह केला होता. सासू-सासर्‍यांना व पतीच्या इतर घरच्यांना त्यांचे लग्न मान्य नसल्याने त्यांच्याकडून जोडप्याला वारंवार त्रास दिला जात होता. म्हणून ते बार्शी येथून पुण्यात राहण्यासाठी आले होते. सासू-सासरे बार्शी येथे राहतात. गेल्या चार महिन्यांपासून फिर्यादीची सासू त्यांच्या मुलीकडे गेल्याने सासरा एकटाच राहत होता. एकटाच पडलेला सासरा सारखाच दारू पित असल्याने 20 जून रोजी पीडित दाम्पत्याने त्यांना पुण्यात राहण्यास आणले. 23 जून रोजी सासरा दारू पिऊन आल्यानंतर पीडितेला सासूचा फोन आल्याने सासर्‍याने तिला शिवीगाळ केली. त्यानंंतर सासरा आणि पती बाहेर ओट्यावर झोपले.

पीडिता एकटीच घरात किचनमध्ये झोपली असताना पहाटेच्या सुमारास घरात जाऊन सासर्‍याने तिच्यावर अतिप्रसंग केला. विरोध केल्याने त्याने जवळच असलेल्या दगडाने तिचे दात पाडले. त्यानंतर पीडित तरुणी बेशुध्द पडली. सहा वाजण्याच्या सुमारास पतीने तिच्या तोंडावर पाणी मारून तिला उठविले. त्यांनी घरात पाहिले असता सासरा दोघांचे दोन मोबाईल व घरातील 60 हजारांची रोकड घेऊन घरातून निघून गेला होता. पीडित महिला घाबरल्याने पोलिस ठाण्यात तक्रार न देता ते तुळजापूर येथे निघून गेले.

25 जून रोजी तुळजापूर पोलिस ठाण्यातून त्यांना उस्मानाबाद येथील दवाखान्यात पाठविण्यात आले. तुळजापूर येथून ही तक्रार लोणी काळभोर पोलिसांकडे पाठविण्यात आली. मंगळवारी गुन्हा दाखल झाल्यानंतर बुधवारी पीडित महिला सासर्‍याला अटकेबाबतची चौकशी करण्यासाठी गेली होती. त्या वेळी तिला तेथील काही पोलिस हसल्याचे तिने त्याच वेळी तेथे आलेल्या चित्रा वाघ यांना सांगितले. त्यावर त्यांनी पोलिसांच्या अशा वागणुकीबद्दल नाराजी व्यक्त केली. या सर्व प्रकरणात पती तिच्यामागे खंबीरपणे उभा आहे.

हेही वाचा

सत्ताधार्‍यांना परिवर्तन पॅनेलचे आव्हान

‘त्याने’ बोकडाला घडवला रेल्वेप्रवास

राखेचे करायचे काय? स्मशानभूमीतील समस्यांबाबत ‘पर्यावरण’कडे विचारणा

Back to top button