खर्चाचा ताळमेळ बसवायचा कसा? घरगुती गॅस महागल्याने सर्वसामान्यांना प्रश्न | पुढारी

खर्चाचा ताळमेळ बसवायचा कसा? घरगुती गॅस महागल्याने सर्वसामान्यांना प्रश्न

पुणे : पुढारी वृत्तसेवा: सरकारने घरगुती गॅस सिलिंडरमध्ये पुन्हा एकदा पन्नास रुपयांनी वाढ केली. आमच्या घरात येणारा पैसा तेवढाच आहे. मात्र, खर्च होणार्‍या पैशांमध्ये वाढ होत आहे. हा ताळमेळ कसा बसवायचा? हा मोठा प्रश्न असल्याचे धायरी येथील मंगलबाई राऊत सांगत होत्या. पुण्यात आता घरगुती गॅस सिलिंडरसाठी 1 हजार 52 रुपये मोजावे लागणार आहेत. सर्वसामान्यांची महागाईने अक्षरशः होरपळ होत आहे. गॅसदरामध्ये गतवर्षीच्या मार्च महिन्यापासून आतापर्यंत तब्बल 238 रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामधील दीडशे रुपयांची वाढ तर गेल्या चार महिन्यांमध्येच झाली आहे.

पुण्यामध्ये सध्या गॅस सिलिंडर 1 हजार 52 रुपयांना ग्राहकांना खरेदी करावे लागणार आहे. सर्वसामान्यांना परवडण्यासाठी सरकारने उज्ज्वला गॅस योजना आणली. मात्र, सध्या उज्ज्वला गॅसधारकांना नवीन गॅस सिलिंडर खरेदी करणे अवघड झाले आहे. त्यातच सरकारने गॅसवरील सवलतदेखील बंद केली. म्हणजे सर्व बाजूंनी नागरिकांची कोंडी करून महागाईच्या खाईत लोटल्याची संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. टिंगरेनगर येथील सविता म्हस्के या गृहिणी म्हणाल्या की, पूर्वी राशनवर मिळणार्‍या रॉकेलवर घरातील स्वयंपाक होत होता. त्यानंतर सरकारने गॅस व सबसिडीचे आमिष दाखवून सिलिंडर माथी मारला. त्यानंतर रॉकेल बंद केले. मिळणारी सबसिडी बंद करीत गॅसची दरवाढ सुरू ठेवली. सरकार भाववाढ करून नागरिकांचा अंत बघत आहे.

Back to top button