रस्ते खोदाई त्वरित थांबवा; मनसेचा आंदोलन करण्याचा इशारा | पुढारी

रस्ते खोदाई त्वरित थांबवा; मनसेचा आंदोलन करण्याचा इशारा

पुणे : पुढारी वृत्तसेवा: पावसाळा होईपर्यंत शहरातील रस्ते खोदू नये आणि सध्याच्या खोदाईच्या परवानग्या रद्द करण्याची मागणी महापालिका आयुक्तांकडे मनसे नेते राजेंद्र वागसकर यांनी केली आहे. खोदाई थांबवली नाही, तर मनसेकडून आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. पावसाळा होईपर्यंत रस्ते खोदाईला परवानगी दिली जाणार नाही. तसेच, शहरातील कोणताही रस्ता यापुढील काळात खोदला जाऊ नये, असे आदेश सर्व विभाग प्रमुखांना असतानादेखील महापालिकेच्या आयुक्तांच्या आदेशाकडेच अधिकार्‍यांनी दुर्लक्ष करून शहरात रस्ते खोदाई सुरूच ठेवली आहे.

शहरातील आपटे रोड, सोमवार पेठ, शिवाजी नगर, कल्याणी नगर अशा अनेक रस्त्यांवर खोदाई होत असल्याचे पाहायला मिळत आहे.
विशेष म्हणजे बिल्डर, मोबाईल कंपन्या, गॅस कंपन्या, महापालिकेचा पथ आणि पाणीपुरवठा विभागच आयुक्तांच्या आदेशाकडे दुर्लक्ष करून रस्ते खोदण्यास पुढे असल्याचे दिसून आले आहे. भर पावसाळ्यातच शहरातील विविध भागांतील रस्ते खोदल्याने अनेक रस्त्यांची अवस्था दयनीय झालेली आहे. अनेक रस्त्यांवर खड्डे पडण्यास सुरुवात झालेली असून, वाहतुकीला अडथळा होत असल्याचे मनसेकडून आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

Back to top button