मुसळधार पावसामुळे तेरा ठिकाणी पडली झाडे | पुढारी

मुसळधार पावसामुळे तेरा ठिकाणी पडली झाडे

पुणे : शहरात मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे तेरा ठिकाणी झाडे पडल्याच्या घटना घडल्या. बुधवारी सकाळी क्वीन्स गार्डन परिसरातील शासकीय विश्रामगृह परिसरात मोठे झाड कोसळले. अग्निशमन दलाच्या जवानांनी मदतकार्य करून रस्त्यात पडलेल्या झाडांच्या फांद्या हटवून वाहतूक सुरळीत केली. शहरात मध्यरात्री मुसळधार पाऊस झाला. पहाटेपर्यंत पाऊस सुरू होता. रात्रभर झालेल्या पावसामुळे तेरा ठिकाणी झाडे पडल्याची माहिती अग्निशमन दलाच्या मुख्य नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली.

दत्तवाडी पोलिस चौकीजवळ, शिवणे परिसरातील शिंदे पूल, विश्रांतवाडी भागातील टिंगरेनगर गल्ली क्रमांक 6, लुल्लानगर, भवानी पेठेतील महापालिका वसाहत, औंधमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, प्रभात रस्त्यावरील गल्ली क्रमांक 14, नवीन शासकीय विश्रामगृहाजवळ, नाना पेठेतील अशोक चौक, आळंदी रस्त्यावरील कळस गावातील जाधववस्ती, हडपसरमधील क्वॉलिटी बेकरीजवळ, कोथरूडमधील मयूर कॉलनी, एरंडवणे भागातील गुळवणी महाराज पथ परिसरात झाडे पडली.

अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाकडे तक्रारी आल्यानंतर जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. झाडे तसेच फांद्या हटवून विविध भागांतील रस्ते वाहतुकीस खुले करून देण्यात आले. पावसामुळे शिवदर्शन परिसरातील विद्युत खांब वाकला. आग लागण्याची एक घटना घडली. आग किरकोळ स्वरूपाची असल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली.

Back to top button