पुण्यात ठिकठिकाणी वाहतूक कोंडी; सिग्नल यंत्रणा कोलमडल्याचा परिणाम | पुढारी

पुण्यात ठिकठिकाणी वाहतूक कोंडी; सिग्नल यंत्रणा कोलमडल्याचा परिणाम

पुणे : पुढारी वृत्तसेवा: दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे बुधवारी सकाळी शहरातील चौकांमधील सिग्नल यंत्रणा कोलमडली. त्याचा फटका वाहनचालकांना बसला. सकाळी शहरातील चौका-चौकांत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. शहरात कात्रज चौक, नरवीर तानाजी मालुसरे (सिंहगड) रस्ता, नवीन सर्किट रोड, मुंढवा, आरटीओ ऑफिस चौक, ना. सी. फडके चौक, टिळक रस्ता, बाजीराव रस्ता, शिवाजी रस्ता, शास्त्री रस्त्यासह शहरातील ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती.

वाहतूक कोंडीमुळे सिंहगड रोडवर पाच मिनिटांच्या प्रवासाला अर्धा अर्धा तास लागत होता. त्यातच राजाराम पूल ते फनटाईम थिएटर दरम्यानच्या उड्डाण पुलाच्या बांधकामामुळे अधिकच वाहतूक कोंडीत भर पडत आहे. शहरात मागील दीड ते दोन वर्षांमध्ये चोवीस तास पाणीपुरवठा, ड्रेनेजलाईन तसेच खोदाईच्या अनेक कामांमुळे बहुतांश रस्त्यांवर केवळ मलमपट्टी करण्यात आली आहे.

सिमेंट काँक्रिटचे रस्ते वगळता शहरातील एकही रस्ता समतल नसल्यामुळे अनेक ठिकाणी पावसात खड्डे पडले असून, काही ठिकाणी वरचेवर टाकलेल्या डांबरातील खडी इतस्तत: पसरली आहे. अशातच मंगळवारी रात्रीपासून शहरातील विविध भागांतील वीजपुरवठा खंडीत झाल्याने सिग्नल यंत्रणाही बंद पडली होती, त्यामुळे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला.

Back to top button