पुणे : कडेवाडीतील बसथांब्याची दुरवस्था | पुढारी

पुणे : कडेवाडीतील बसथांब्याची दुरवस्था

महाळुंगे पडवळ : पुढारी वृत्तसेवा : कळंब-साकोरे-चास रस्त्यावरील कडेवाडी (ता. आंबेगाव) येथील बसथांब्याचा स्लॅब लोंबकळला असून, त्याला चिरा पडल्या आहेत. तो केव्हाही पडू शकतो. त्यामुळे येथे आसरा घेणार्‍या प्रवाशांचा जीव धोक्यात येऊ शकतो. या बसथांब्याची दुरवस्था झाली असून, त्वरित दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी येथील रहिवाशांनी केली आहे.

कळंब-साकोरे-चास-घोडेगाव रस्त्यावर कडेवाडी फाटा येथे सन 2010 चे दरम्यान प्रतीक्षा बसथांबा बांधण्यात आला. त्यानंतर या थांब्याची दुरुस्ती करण्यात आली नाही. या थांब्याचा स्लॅब खाली लोंबकळला आहे. त्यातून पाणी गळत आहे, भिंतींना चिरा पडल्या आहेत, थांब्यातील बाक तुटले आहेत, कोपर्‍यात बाटल्यांचा खच दिसत आहे.

घोडेगाव तालुक्याच्या गावाला जाणारे शेकडो प्रवासी येथे थांबतात. येथे नवीन बसस्थानक उभारण्यात यावे, अशी मागणी माजी तंटामुक्ती अध्यक्ष सतीश चासकर, सामाजिक कार्यकर्ते नाना चासकर, बजरंग दलाचे प्रमुख नितीन चासकर, ईश्वर चासकर आदी कार्यकर्त्यांनी केली आहे.

Back to top button