पुणे : काळभैरवनाथाचे मंदिर बांधकाम अंतिम टप्प्यात | पुढारी

पुणे : काळभैरवनाथाचे मंदिर बांधकाम अंतिम टप्प्यात

ओतूर : पुढारी वृत्तसेवा : पुणे, ठाणे व नगर जिल्ह्यातील अवघ्या भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या नगर-कल्याण महामार्गालगतच्या सुमारे 300 उंबर्‍याच्या खामुंडी (ता. जुन्नर) गावात विलोभनीय असे श्री काळभैरवनाथाचे भव्य देवालयाचे बांधकाम अंतिम टप्प्यात आले आहे. येत्या दिवाळीपर्यंत ते पूर्ण होणार असल्याची माहिती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष मारुती शिंगोटे, उपाध्यक्ष उपेंद्र डुंबरे, कार्याध्यक्ष संदीप गंभीर व सचिव सुभाष बोडके यांनी दिली.

श्री काळभैरवनाथ मंदिराचे काम सन 2014 मध्ये चालू झाले. गुजरात अहमदाबाद येथील देवेंद्रभाई सोमपुरा या कारागिराच्या देखरेखीत काम पूर्णत्वास जात आहे. सभामंडपाचे काम पिंडवाडा (राजस्थान) येथील जाफरभाई खाँन यांनी केले असून, फक्त सभामंडप कामाचा 2.25 कोटी रुपये खर्चाचा अंदाज आहे. पैकी अंदाजे 1.5 कोटी रुपयांचे काम झाले असून, फक्त दगडाचे काम येत्या दोन महिन्यांत सप्टेंबरपर्यंत पूर्ण होणार आहे.

इन्ले डीझाइनचे काम मखराना येथील रहिमभाई यांना देण्यात आले आहे. सिलिंगचे काम डोंबिवलीचे सपकाळ यांना देण्यात आले आहे. मंदिरासमोर नांदेड ब्लॅक स्टोनमध्ये सुंदर डीझाईन असलेल्या दीपमाळेचे काम नांदेडचे उमाकांत जाधव यांना दिले आहे. श्री काळभैरवनाथ मंदिर सभामंडप लोकार्पण सोहळा येणार्‍या कार्तिक महिन्याच्या अखंड हरिनाम सप्ताहात होणार आहे.

अनेक धार्मिक विधीसह भव्य लोकार्पण सोहळा होणार आहे. फक्त 300 उंबरा असलेल्या छोट्याशा खामुंडी गावाने ही घेतलेली गरूडझेप नक्कीच कौतुकास्पद आहे. जुन्नर तालुक्याच्या वैभवात भर घालणारे एक धार्मिक पर्यटनस्थळ म्हणून मंदिर लवकरच भाविकांना दर्शनासाठी उपलब्ध होत असल्याने सर्वत्र समाधान व्यक्त केले जात आहे.

Back to top button