पुणे : अष्टविनायक रस्त्यावर वाहतुकीच्या नियमांना फाटा | पुढारी

पुणे : अष्टविनायक रस्त्यावर वाहतुकीच्या नियमांना फाटा

मंचर : पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा आणि जुन्नर, आंबेगाव, खेड या परिसरातून जात असलेल्या अष्टविनायक रस्त्याची दुरुस्ती झाल्याने वाहनांचा वेग वाढला आहे. वाढत्या वेगाने अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. अनेकांचा मृत्यू, तर अनेक जण जखमी झाले आहेत. रस्ता मृत्यूचा सापळा बनला असून, रस्ते विभागाने योग्य सुधारणा करण्याची मागणी होत आहे.

अष्टविनायक रस्ता ओझर ते रांजणगाव गणपतीकडे जाणारा रस्ता आहे. जुन्नर, आंबेगाव, खेड या परिसरातून हा रस्ता जात असून, या रस्त्याने मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. रस्त्याचे काम अजूनही सुरू असून, रस्त्याला मोठ्या प्रमाणात वळणे आहेत. हा रस्ता वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. गणेशभक्तांसह सामान्य नागरिकांकडूनही मोठा वापर होतो. पुणे-नाशिक हमरस्त्याला हा रस्ता मिळत असल्यानेही मोठ्या वाहनांचीही मोठी वर्दळ असते.

नागरिकांना कामानिमित्त या शहरात कमी वेळेत पोहचता येते. शेतकर्‍यांनाही शेतमाल बाजारपेठेत कमी वेळात पोचवता येते. त्यामुळे वाहतुकीच्या दृष्टीने या रस्त्याला महत्त्व प्राप्त झाले आहे. मात्र, वाहनचालक वाहतुकीचे कोणतेही नियम पाळत नाहीत. वाहने सुसाट धावत आहेत. रस्त्याला अनेक ठिकाणी जीवघेणी वळणे असून, वाहनांच्या वेगामुळे रस्त्यावर अपघातांचे प्रमाण वाढत चालले आहे. रस्त्यावर असलेल्या अनेक गावांतील ग्रामस्थांना, शाळकरी विद्यार्थ्यांना रस्त्याने प्रवास करताना जीव मुठीत धरुन जावे लागत आहे.

पूर्वी हे रस्ते छोटे, रस्त्याला चढ-उतार आणि खड्डेही असल्याने वाहने कमी वेगाने चालत होती. अपघातही होत नव्हते. परंतु, अष्टविनायक रस्त्याचे रुंदीकरण, सपाटीकरण व डांबरीकरण झाल्याने वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वळणे आहेत. नाशिक तसेच पुणे या परिसरातून मोठ्या प्रमाणात वाहने भरधाव वेगाने जात आहेत. परिणामी, परिसरातील नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. वाहतूक नियंत्रण विभागानेही रस्त्यावर वाहतुकीच्या नियमांचे पालन होण्याबाबत लक्ष देण्याची गरज आहे. हमरस्त्यावरील गतिरोधकांची आगाऊ सूचना देणारे फलक नसल्यानेही अपघात वाढले आहेत. धोकादायक वळणेही अपघातांना निमंत्रण देणारी ठरत आहेत.

अष्टविनायक रस्ता हा हमरस्ता असल्याने वाहनचालकांनी गावे, वाड्या-वस्त्यांजवळ वाहनाचा वेग कमी करावा. शेतकरी, वाहनचालक व नागरिकांनाही वाहतुकीचे नियम पाळावेत. वळताना, रस्ता पार करताना दोन्ही बाजूला वाहने पाहावीत. दारूच्या नशेत वाहने चालू नयेत.
लहू थाटे, सहायक पोलिस निरीक्षक, पारगाव पोलिस स्टेशन

Back to top button