येरवडा : दिवसाआड पाण्याचे नियोजन कोलमडले; गांधीनगर भागाला टँकरने पाणीपुरवठा | पुढारी

येरवडा : दिवसाआड पाण्याचे नियोजन कोलमडले; गांधीनगर भागाला टँकरने पाणीपुरवठा

येरवडा : पुढारी वृत्तसेवा : महापालिकेने दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केल्यानंतर येरवड्यातील गांधीनगर, जयप्रकाशनगर भागात दिवसाआड तेही कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने या भागाला टँकरने पाणी पुरवावे लागले. दिवसाआड असू दे; पण पुरेसे पाणी द्या, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

जयप्रकाशनगर, गांधीनगर भागाला मात्र दिवसाआड पाणीदेखील पुरेसे मिळत नसल्याने नागरिकांमधून प्रचंड असंतोष आहे. या भागाला पाणी मिळाले नसल्याने बंडगार्डन पाणीपुरवठा विभागाने आज टँकर पाठविले होते. टँकर येताच नागरिकांनी टँकरमधून पाणी भरण्यासाठी प्रचंड गर्दी केली.

मनसेचे प्रभाग अध्यक्ष मनोज ठोकळ म्हणाले, की गांधीनगर भागाला दिवसाआड पाणीदेखील कमी प्रमाणात मिळत असल्याने नागरिक प्रचंड वैतागले आहेत. जर, या भागाला नळाद्वारे पुरेसे पाणी मिळाले नाही, तर मनसे स्टाइलने आंदोलन केले जाईल.

पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता मधुकर थोरात म्हणाले, की दिवसाआड पाणीपुरवठा केला जात असल्याने जलवाहिन्या रिकामी राहून या ठिकाणी हवा जमा होत असल्याने वाहिन्यातून पुरेसे पाणी मिळत नाही. काही दिवसांत या भागालादेखील पुरेसे पाणी दिले जाईल. ईद व आषाढी एकादशी दिवशी मुबलक पाणी सोडले जाणार आहे.

Back to top button